दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नव्हे मंदिरच!:कल्याण कोर्टाचा निर्णय; ‘वक्फ’कडे वर्ग करण्याचा दावाही फेटाळला, 1971 चे प्रकरण
ठाण्याजवळील कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भातील महत्त्वाचा निकाल आज सत्र न्यायालयाने दिला आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे की मशीद यासंदर्भातील निकाल न्यायालयाने दिला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला आहे. मागील बऱ्याच काळापासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणाचा निकाल आता लागला आहे. कल्याणमधील सत्र न्यायालयाने ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिर असल्याचे अध्यादेश जारी केले आहेत. मंदिर की मशीद हा वाद फार पूर्वीपासून सुरू होता. 1971 साली ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणी सुनावणी झाली होती. त्यानंतर आता न्यायालयानेच या किल्ल्यावर मंदिर असल्याचे स्पष्ट केल्यानंतर हिंदू संघटनेचे पदाधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते दुर्गाडी किल्ल्यावर जमत आरती करत जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळले. घंटानाद आंदोलन केले होते सुरू गेल्या काही वर्षांपासून बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लीम समुदाय दुर्गाडी किल्ला भागात असलेल्या मशिदीत नमाज अदा करायचे. या कालावधीत खबरदारी म्हणून मंदिर बंद ठेवण्यात यायचे. यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी घंटा नाद आंदोलन सुरू केले होते. या वर्षीच्या जून महिन्यात देखील बकरी ईदनिमित्त मंदिर बंद ठेवण्यात आले होते. यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने घंटानाद आंदोलन केले होते. मंदिरात प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेण्यात आली होती. 90 च्या दशकात धर्मवीर आनंद दिघे यांनी इथे घंटानाद आंदोलन केले होते. काय आहे प्रकरणाचा इतिहास? हिंदू मंचचे अध्यक्ष दिनेश देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 1971 मध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही जी आपण वास्तू बघतो, ती मंदिर म्हणून त्यांनी जाहीर केलेली आहे. ही वास्तू मंदिर की मशीद असा चौकशीचा अर्ज होता. त्यामध्ये हिंदूंच्या बाजूने भाऊसाहेब मोडक यांनी चांगल्या रितीने हा दावा दाखल केला. या खटल्यात कोर्टाने आमचे म्हणणे मान्य केले. मशीदला कुठल्याही प्रकारच्या खिडक्या नसतात. या वास्तूला खिडक्या आहेत. या ठिकाणी मोठी उभी राहण्यासाठी जागा आहे. ज्याला आपण देवालय म्हणतो. देवालयाच्या दृष्टिकोनातून असणारी ही वास्तू मंदिरच आहे. हे शासनाने तेव्हा जाहीर केल्याचे सांगितले. वक्फची मागणीही फेटाळली दिनेश देशमुख पुढे म्हणाले की, 1976 मध्ये हे मंदिर नसून मशीद आहे, असा दावा 1975-76 मध्ये ठाणे जिल्ह्यात चालला. तो ठाणे जिल्हा न्यायालयातून कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला. त्याचा नंबर 305213 असा होता. त्यावेळी त्यांनी असा अर्ज केला की, हा वक्फ आहे. त्यामुळे हा दावा कल्याण जिल्हा न्यायालयात न चालवता तो वक्फ बोर्डाकडे वर्ग करावा. हा सुद्धा अर्ज कल्याण जिल्हा न्यायालयाने फेटाळला. सरकारने जो निर्णय दिला, तो योग्यच आहे. हे मंदिरच आहे, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक वाढल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येतो. दरम्यान, अनेकदा या भागामध्ये धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या या प्रकरणावर निकाल लागल्याने आता हा वाद शांत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.