बंगळुरूतील आत्महत्याप्रकरणी कुटुंबीयांची न्यायाची मागणी:अभियंत्याचे वडील म्हणाले, माझा मुलगा थकला होता, यंत्रणेमुळे ताे खचून गेला
बंगळुरूचा एआय अभियंता अतुल सुभाष याच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे. अतुलचा भाऊ विकास बुधवारी म्हणाला, ‘पुरुषांचे आयुष्य हे महिलांइतकेच महत्त्वाचे आहे. पुरुषांना ते एटीएम बनत असल्याची भीती वाटत आहे. ते लग्नालाही घाबरतील. माझा भाऊ न्यायासाठी न्यायालयात गेला असता त्याला तेथे अपमानित करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. दुसरीकडे सुभाषच्या आईची रडून अवस्था वाईट झाली आहे. आपल्या मुलाला न्याय मिळवून द्या, असे ती येणाऱ्या प्रत्येकाला सांगत आहे. वडील पवन मोदी म्हणाले ‘माझा मुलगा थकला होता, पण त्याने आम्हाला काहीच सांगितले नाही. तो अस्वस्थ झाला आणि यंत्रणेने त्याला खचवले. कायदा फक्त महिलांच्या बाजूने आहे. माझा मुलगा गेला, असे कुणासोबतही होऊ नये.’ दरम्यान, पोलिसांनी सुभाषची पत्नी निकिता, सासू निशा, मेव्हणा अनुराग व चुलत सासरे सुशील सिंघानिया यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.अतुलच्या कुटुंबीयांनी सांगितले की, निकिताने आधी ५० लाख रुपये, नंतर १ कोटी आणि नंतर ३ कोटी रुपये सेटलमेंटसाठी मागितले. एवढेच नाही तर मुलांसाठी आणि स्वतःसाठी दरमहा एक लाख रुपये मागत होती. अतुलने इतके पैसे देण्यास नकार दिल्यावर निकिता त्याला- जा मर… असे म्हणाली. बिहारमधील समस्तीपूर येथे राहणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल याने पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून छळ आणि कोर्टातील कथित भ्रष्टाचाराला कंटाळून बंगळुरूत आत्महत्या केली होती. मीडिया पोहोचल्यावर पत्नीच्या कुटुंबीयांनी दार उघडले नाही…धमकीही दिली सुभाषची पत्नी निकिताच्या कुटुंबीयांना या घटनेचा पश्चात्ताप होताना दिसत नाही. हे जाणून घेण्यासाठी मीडिया पोहोचला तेव्हा सुभाषची सासू आणि मेव्हण्याने दरवाजा उघडला नाही. कॅमेरा पाहून तो संतापला अन् म्हणाला, व्हिडिओ बनवू नका, नाही तर वाईट होईल.