दिव्य मराठी अपडेट्स:सोने वितळवण्याची याचिका रद्द; तुळजाभवानी मंदिर समितीची विनंती खंडपीठाने फेटाळली
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स सोने वितळवण्याची याचिका रद्द; तुळजाभवानी मंदिर समितीची विनंती खंडपीठाने फेटाळली तुळजापूर – तुळजाभवानी मातेला भाविकांनी अर्पणकेलेले सोने व चांदी वितळवण्याची परवानगी करिता मंदिर संस्थानची दाखल याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील विवाद प्रलंबित असल्याच्या कारणारवरुन हा आदेश दिला. सोने व चांदी वितळवण्याची प्रक्रिया आता लांबणीवर पडणार आहे. हिंदूजनजागृती समितीने तुळजापूर मंदिर संस्थानच्या सोने वितळवण्याच्या परवानगी संदर्भात दाखल अर्जाला विरोध दर्शविला. १ जानेवारी २००९ ते १० जून २०२३ या कालावधीत अर्पण केलेले २०६ किलो ७२३ग्रॅम सोने व २५७० किलो चांदी वितळवून शुद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळली. जैनधर्मीय आचार्य भगवंत पुण्यपाल सुरींचे महानिर्वाण नाशिक – जैन धर्मीयांचे विद्यमान गच्छाधिपती संघनायक व सुमारे २००० साधुसंतांचे मुख्य प.पू. आचार्य भगवंत श्रीमद् विजय पुण्यपाल सुरीश्वरजी (७८) यांचे गुरुवारी अल्पकालीन आजाराने मुंबईत वीणानगर संघ उपाश्रयमध्ये महानिर्वाण झाले. नवकार महामंत्राचे स्मरण करता करता सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८ व्या वर्षी वणी येथे त्यांनी जैन धर्मशास्त्राप्रमाणे त्यांनी बालदीक्षा घेतली व अत्यंत अभ्यासपूर्ण अवस्थेत शास्त्रशुद्ध आचरण करून नावलाैकिक वाढवला. त्यांचे वडील आचार्य सुविशाल वात्सल्य निधी प.पू. आ.भ. महाबळ सुरीश्वरजी महाराज व आई जैन साध्वी प.पू. विमल कीर्तीश्रीजी या दाेघांनीही दीक्षा घेतली व त्यांचे महानिर्वाण झाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अनिल सोनारांचे निधन धुळे – ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अनिल सोनार (७९) यांचे गुरुवारी पहाटे धुळ्यात वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी अत्यंसस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. प्रा. अनिल सोनार यांची ८० पुस्तके प्रकाशित झाली होती. त्यात २१ नाटके, ३ कादंबऱ्या, ६ काव्य संग्रह, ३८ एकांकिका, १ आस्वादक समीक्षापर लेख संग्रह, १ विनोदी लेखसंग्रह, ५ बालकथा संग्रह, २ एकांकी संग्रह, १ हिंदी नाटक, २ कथा संग्रहांचा समावेश आहे. तसेच ते महाराष्ट्र राज्य, जळगाव आकाशवाणी केंद्राचे सल्लागार सदस्य, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या धुळे शाखेचे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जिल्हा शाखेचे अध्यक्षपद भूषवले.
मुंबईत आता इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनांना प्रवेश? मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालून फक्त सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी देण्याची तयारी राज्य शासनाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गृह विभागाने निवृत्त आयएएस अधिकारी सुधीरकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या शासन आदेशानुसार, परिवहन आयुक्त, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), मुंबई, महानगर गॅस निगमचे व्यवस्थापकीय संचालक, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सचे अध्यक्ष आणि महावितरणचे प्रकल्प संचालक या समितीत सदस्य, तर सहपरिवहन आयुक्त सदस्य सचिव असतील. जिल्हा विभाजन टाळून २ अपर जिल्हाधिकारी कार्यालयांवरच बोळवण मुंबई – राज्यातील अनेक मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र त्यासाठी पुरेसा निधी नसल्याने सर्वच सरकारे त्यासाठी टाळाटाळ करत आहेत. आता फडणवीस सरकारने त्यावर एक पर्याय शोधला आहे. राज्यातील सर्व मोठ्या जिल्ह्यांत संपूर्ण आस्थापनेसह दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करा, अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांनी दिल्या आहेत. या जिल्ह्यांत आता दोन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांची उभारणी केली जाणार आहे. अहिल्यानगर एसपींना ५ हजार दंड : खंडपीठ छत्रपती संभाजीनगर – फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३) प्रमाणे आदेश असताना बँक कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्याबद्दल अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक आणि कोपरगाव पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती रोहित डब्ल्यू. जोशी यांनी ठोठावला. त्यांनी दंडाची रक्कम स्वतःच्या खिशातून द्यावी, असेही आदेश दिले. कोपरगाव येथील चंद्रकांत शिंदे यांनी फसवणुकीच्या प्रकरणात बँकेचे कर्मचारी ज्ञानदेव बोरावके, पोपट गायकवाड, पोपट कोरडे व वसुली अधिकारी एस. बी. लोंढे, आर. टी. अग्रवाल या सर्वांविरुद्ध कोपरगाव न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तपासासाठी पोलिसांना आदेश दिले होते. परंतु, पोलिसांनी प्रकरणात ‘एफआयआर’ दाखल करून तपास केला नाही. त्यामुळे शिंदे यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली. खंडपीठाने त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून निष्क्रियतेबद्दल खुलासा मागितला होता. परंतु, त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे हायकोर्टाने त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.
अहिंसेच्या रक्षणासाठी कधी हिंसाही आवश्यक : भय्याजी अहमदाबाद – अहिंसा विचारांच्या रक्षणासाठी कधी-कधी हिंसेचीही आवश्यकता असते. हिंदू समाज धर्माच्या रक्षणासाठी नेहमीच कटिबद्ध राहिला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी यांनी केले. अहमदाबादेत गुरुवारी चार दिवसीय हिंदू अाध्यात्मिक व सेवा मेळाव्याचे उद्घाटन झाले.त्याप्रसंगी ते बोलत होते. जोशी म्हणाले, हिंदूचा अर्थच धर्म, अध्यात्म, विचार, जीवनशैली आणि जीवनाचे मूल्य व सेवा हे आहे. हिंदू धार्मिक संस्थांचे कार्य केवळ पूजाअर्चा, अनुष्ठान आणि कर्मकांडापुरतेच मर्यादित नसून त्यांच्यावतीने अनेक सेवा कार्य, गुरुकुलही चालवले जातात. एक विशिष्ट समुदायाचे लोकच सेवा कार्य करतात असा भ्रम जगभरात निर्माण केला गेला आहे. तथापि, भारतात तर भंडारा, लंगर, अन्नछत्र आदींची अखंड परंपरा आहे. या ठिकाणी दररोज सरासरी कोट्यवधी लोक भोजन प्रसादाचा लाभ घेतात, असे जोशी यांनी सांगितले. गंडा घालणाऱ्या संस्थेचे अॅम्बेसेडर तळपदे, अालोकनाथवरही गुन्हा सोनिपत – हरियाणातील सोनिपत येथील ह्यूमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने जास्त नफ्याचे आमिष दाखवून देशभरातील ५० लाख ठेवीदारांकडून पैसे गोळा केले. परंतु जास्तीचे व्याज देणे दूरच, पण मुद्दल रक्कमही या ठेवीदारांना न देता सोसायटी बंद केली. याप्रकरणी सोसायटीच्या १३ संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या सोसायटीचा ब्रँड अॅम्बेसेडर बनून जाहिरात करणारा अभिनेता श्रेयस तळपदे, ज्येष्ठ अभिनेते अालाेकनाथ यांच्याविरोधातही मुरथल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हसनपूर गावातील विपुल यांनी सांगितले की, ही सोसायटी मध्य प्रदेशातील इंदूर येथे नोंदणीकृत होती. १६ सप्टेंबर २०१६ पासून हरियाणासह इतर राज्यात तिच्या शाखा होत्या. मल्टिलेव्हल मार्केटिंगचेे हे रॅकेट होते. त्यांनी ५० लाखांहून अधिक एजंट व गुंतवणूकदार जोडले होते. अभिनेता सोनू सूद हाही या कंपनीच्या एका कार्यक्रमासाठी आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कपिल शर्मा, राजपाल, रेमो डिसूझा यांना धमकी मुंबई – कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेता राजपाल यादव आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना धमकीचे ई-मेल मिळाले आहेत. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यादवला गेल्या वर्षी १४ डिसेंबरला ई-मेल मिळाला होता. गुरुवारी या प्रकरणाचा उलगडा झाला. ई-मेलमध्ये लिहिले होते की, आम्ही तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहोत. आम्हाला वाटते की हे संवेदनशील प्रकरण तुमच्या लक्षात आणणे आवश्यक आहे. हा पब्लिसिटी स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही. प्राथमिक तपासानुसार, हा ई-मेल don99284@gmail.com आयडीवरून पाकिस्तानहून पाठवला गेला होता.