‘काल, आज आणि उद्याही उद्धव ठाकरेंसोबत’:शिंदेंच्या मंत्र्यांचा दावा आमदारांनी फेटाळला; पक्षांतराच्या चर्चेवर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आमदार कैलास पाटील आणि खासदार ओम राजेनिंबाळकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आम्ही निवडून आलो आहोत. आम्ही त्यांची साथ कधीही सोडणार नाही. आम्ही संघर्ष करून पक्ष वाढवू, असा निर्धार आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेवर त्यांनी एका अर्थाने पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. त्यातच धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय फेरबदल होऊ शकतात, असे संकेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र याबाबत ठाकरे गटात कुठलीही अस्वस्थता नाही. आम्ही कालही ठाकरे सोबत होतो आणि उद्याही ठाकरेंसोबत असू, असे कैलास पाटील यांनी म्हटले आहे. खासदार ओम राजेनिंबाळकर आणि मी दोघेही ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी लवकरच ऑपरेशन टायगर राबवण्याचे संकेत दिले होते. धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर त्यात वावगे वाटायला नको, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. भविष्यातही तुम्ही अनेक बदल अनुभवताल, असे देखील ते म्हणाले होते. विधानसभा निवडणुकीत या राज्यातील जनतेने दाखवून दिला आहे की, खरी शिवसेना कोणाची आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात बदल झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असे वक्तव्य देखील सरनाईक यांनी केले होते. सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटातील कोणते नेते एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागणार? याची चर्चा सुरू झाली होती. यामध्ये जिल्ह्याचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी आणि आमदार कैलास पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नवीन सरकार आल्यापासून जिल्ह्यातील काही लोकांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता महाराष्ट्राला दिसत आहे. मात्र आम्ही कालही उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो आणि आज आणि उद्याही राहणार असल्याचे कैलास पाटील यांनी स्पष्ट केले. शिवसैनिक आणि ठाकरे यांच्यामुळेच आम्ही आमदार झालो असल्याची जाणीव मला आहे, असे देखील पाटील यांनी म्हटले आहे.