ट्रम्प यांनी अवैध भारतीय प्रवाशांना लष्करी विमानाने मायदेशी धाडले:विमान आज अमृतसरला पोहोचणार, हकालपट्टीची सर्वात मोठी मोहीम
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदा प्रवेश केलेल्या परदेशी नागरिकांची हकालपट्टीची सर्वात मोठी मोहीम सुरू केली आहे. भारतीय वेळेनुसार मंगळवारी पहाटे अमेरिकी लष्कराच्या सी-१७ ग्लोबमास्टर विमानाने अवैध भारतीय प्रवाशांचा पहिला जत्था मायदेशी धाडण्यात आला. सॅन अँटोनियोहून उड्डाण घेतलेले हे विमान बुधवारी अमृतसरला पोहोचेल. यात २०५ अवैध प्रवासी असू शकतात. प्रथमच अवैध प्रवाशांना लष्करी विमानाने भारतात धाडण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २४ दरम्यान बायडेन प्रशासनाने ११०० अवैध प्रवाशांना चार्टर्ड विमानाने पाठवले होते. अमेरिकी इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंटच्या (आयसीआय) यादीनुसार आणखी १९ हजार भारतीयांना मायदेशी धाडण्यात येणार आहे. आयसीआय पथकाने ३१ जानेवारीपर्यंतच्या कारवाईत १७०० भारतीयांना अवैध प्रवेश केल्याबद्दल ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ फेब्रुवारी रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार असून त्याच्या तोंडावरच ट्रम्प यांनी हकालपट्टीची कारवाई केली आहे. १३ फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या व्दिपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे. मेक्सिको-कोलंबियाने अमेरिकेचे विमान माघारी पाठवले मेक्सिको-कोलंबियाने अवैध प्रवाशांनी भरलेले अमेरिकी विमान माघारी पाठवली. या विमानांना उतरण्यास या देशांनी परवानागीच दिली नाही. नंतर अवैध प्रवाशांना विमानाऐवजी सीमेवरुन मायदेशी परत घेण्याची तयारी मेक्सिकाेने दर्शवली. तर ट्रम्प यांनी २५% व्यापार कर लादण्याची धमकी देताच कोलंबियाने स्वत:ची विमाने पाठवून आपल्या अवैध प्रवाशांना माघारी बोलावण्याची तयारी दर्शवली होती. अमेरिकेच्या ताब्यात २ लाख भारतीय,त्यांनाही परत आणावे लागेल – शशी थरूर : अवैध प्रवासी भारतीयांना मायदेशी धाडण्याच्या मुद्यावर देशात राजकारण तापले आहे. गेल्या ४ वर्षात मेक्सिको-कॅनडा सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या २ लाख भारतीयांना अमेरिकेने ताब्यात घेतले आहे,असा दावा परकीय व्यवहार संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष तथा काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केला आहे. चौकशी सर्वच भारतीय असल्यास त्यांना मायदेशी आणण्याची जबाबदारी आपली आहे. माघारी धाडण्याची मोहिम अजून सुरु राहील. अमेरिकेत सध्या ७.२५ लाख अवैध भारतीय प्रवासी आहेत,असा अंदाजही थरूर यांनी व्यक्त केला आहे. प्यू रिसर्चच्या अहवालानुसारही अमेरिकेत सध्या ७.२५ लाख अवैध भारतीय प्रवासी आहेत. मेक्सिको,एल साल्वाडोरनंतर भारताचा तिसरा क्रमांक आहे. आधी २०५ प्रवाशांचा डेटा तपासला सर्व २०५ अवैध प्रवाशांचा भारतातच रहिवास असल्याचा तपशील बारकाईने तपासण्यात आला. 23 जानेवारी: परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकी परराष्ट्रमंत्री मार्क रुबियोंशी चर्चा केली.त्यात डिपोर्ट करण्याबाबत सहमती झाली. 27 जानेवारी: योग्य तेच केले जाईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी फोनवर दिल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. अमेरिकेने आतापर्यंत चार देशांच्या नागरिकांना पाठवले, भारत पाचवा ट्रम्प सरकारने आतापर्यंत ग्वाटेमाला, होंडुरस, इक्वेडोरआणि पेरूसारख्या चार छोट्या देशांच्या बेकायदा नागरिकांना मायदेशी धाडले आहे. भारत हा पाचवा देश आहे. अमेरिकेने माघारी पाठवलेल्या देशांमध्ये भारत हा सर्वात दीर्घ अंतरावरील देश आहे. अमेरिका ते भारत यांच्यातील अंतर सुमारे ११ हजार किमी आहे. तर पेरूचे अंतर सुमारे ६ हजार किमी आहे. विमानावर ६ कोटी खर्च, प्रवासात नागरिकांना हातकड्या ग्लोबमास्टरला भारतात पाठवण्याचा खर्च सुमारे ६ कोटी रुपये आहे. एखाद्या चार्टर्ड विमानापेक्षा हा खर्च सहापट अधिक आहे. पूर्ण प्रवासादरम्यान भारतीय नागरिकांच्या हाती बेड्या घातलेल्या असतील. बेकायदा प्रवेश करणाऱ्यांना ट्रम्प यांनी गुन्हेगार म्हटले आहे. लष्करी विमानाने रवानगी करून अमेरिकेत आता घुसखोरांसाठी जागा नाही, असा संदेशच अमेरिकेने दिला आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारताला लाभ : तज्ज्ञांचे मत अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा भारताला भविष्यात माेठ्या प्रमाणात फायदा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर व्यापार कर लादले होते. त्या वेळी दोन वर्षांच्या कालावधीत भारताची अमेरिकेला होणारी निर्यात ५७ अब्ज डॉलर्सवरून ७३ अब्ज डॉलर्स इतकी वाढली होती. चीनने अमेरिकेवर लादले १५% टेरिफ