महिला तलाठ्यास ट्रॅक्टर अंगावर घालून जिवे मारण्याची धमकी:पुरजळ शिवारातील घटना, तिघांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
जवळाबाजार ते पुरजळ मार्गावर पुरजळ शिवारात वाळूचे ट्रॅक्टर पकडल्यानंतर महिला तलाठ्यास ट्रॅक्टर अंगावर घालून जिवे मारण्याची धमकी देऊन अश्लिल भाषेत शिवीगाळ करणाऱ्या तिघांवर गुरुवारी ता. ६ औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. त्यानुसार पाचही तहसील कार्यालर्यांतर्गत कर्मचाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. या शिवाय त्या त्या सज्यातील तलाठ्यांची पथकेही कार्यरत ठेवण्यात आली आहे. दरम्यान, जवळाबाजार ते पुरजळ मार्गावर पुरजळ शिवारातून अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती तलाठी सुवर्णमाला सिरसाठ यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून तलाठी सिरसाठ यांच्या पथकाने बुधवारी ता. ५ सायंकाळी वाहनांची तपासणी सुरु केली. यामध्ये एका ट्रॅक्टरमध्ये वाळूची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. यावेळी तलाठी सिरसाठ यांनी चालकाकडे चौकशी करण्यास सुरवात केली. त्याने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने ट्रॅक्टर औंढा नागनाथ तहसील कार्यालयात नेण्याचे सांगितले. यावेळी ट्रॅक्टर औंढा नागनाथ तहसील कार्यालयात नेत असताना नागेशवाडी शिवारात आल्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या प्रल्हाद आहेर (रा. नालेगाव) व गणेश घुगे (रा. असोला) यांनी तेथे येऊन तलाठी सिरसाठ यांना शिवीगाळ करून ट्रॅक्टर अंगावर घालून जिवे मारण्याच धमकी दिली. या प्रकरणी तलाठी सिरसाठ यांनी आज पहाटे औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून प्रल्हाद आहेर, गणेश घुगे व ट्रॅक्टर चालकावर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे पुढील तपास करीत आहेत.