गुजरात डीआरआय-गुजरात एटीएसच्या संयुक्त कारवाईतील घबाड:अहमदाबादच्या बंद फ्लॅटमध्ये दडवून ठेवले होते तब्बल ९५.५० किलो सोने

६० लाख रोखीसह ८७.५० कोटी जप्त अहमदाबादमध्ये एका बंद फ्लॅटमधून ९५.५ किलोग्रॅम सोने व ६० लाख रुपये रोकड जप्त करण्यात आले. एकूण जप्ती ८७.५० कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात आले. डीआरआय व गुजरात एटीएसने पाच दिवसांच्या निगराणीनंतर दुपारी अडीचच्या सुमारास पालडी भागातील अविष्कार अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर १०४ मध्ये छापा टाकण्यात आला. तेव्हा फ्लॅट बंद दिसून आला. वकिलांच्या माध्यमातून चावी मागवून फ्लॅट उघडण्यात आला. जप्त कलेले सोने आयात स्वरूपाचे आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार परदेशी बिस्किटाची मागणी भारतात वाढू लागली आहे. कारण शुद्धतेच्या बाबतीत परदेशी बिस्किटांना महत्त्व दिले जाते. हा फ्लॅट मेघ शाह व महेंद्र शाह नावाच्या दोन भावांनी भाड्याने घेतला आहे. दोघेही शेअर बाजारातील ऑपरेटर आहेत. बिल्डर लॉबीला देखील वित्त पुरवठा करतात. आजूबाजूच्या लोकांच्या म्हणण्यानुसार फ्लॅट बहुतांशवेळा बंद असतो. त्यातही लोकांची ये-जा सुरू असे.