पोटच्या मुलानेच केला वडिलांचा खून:गप्पा मारता मारताच धारदार शस्त्राने केला वार, घटनेने बदलापूर हादरले

पोटच्या मुलानेच केला वडिलांचा खून:गप्पा मारता मारताच धारदार शस्त्राने केला वार, घटनेने बदलापूर हादरले

बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलानेच वडिलांचा खून केल्याचे वृत्त समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गप्पा मारता मारताच मुलाने वडिलांच्या पोटात धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती समोर आली आहे. अनंत कराळे असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव असून आरोपी मुलगा गणेश कराळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रॉपर्टी आणि पैशांच्या वादातून हा खून करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. बदलापूरच्या बेलवली परिसरात अनंत कराळे यांचा व्यावसायिक गाळा असून तो खान केटरर्स यांना भाड्याने दिले आहे. या ठिकाणी आरोपी मुलगा गणेश कराळे आणि त्याचे वडील अनंत कराळे हे बुधवारी सकाळी 7.30 च्या सुमारास आले होते. यावेळी भाडेकरूंना बाहेर पाठवून दोघे दुकानाच्या मागच्या बाजूला गेले. तिथे गप्पा मारत असताना आरोपी मुलाने धारदार शस्त्राने वडिलांच्या पोटात वार केले. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला असून परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनंत कराळे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूर पूर्व येथील ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्येचे कारण तपासात स्पष्ट होईल असेही पोलिसांनी सांगितले आहे. ही हत्या प्रॉपर्टी आणि पैशांच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, बदलापूर काही महिन्यांपूर्वी बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरले होते. त्यानंतर पुन्हा या हत्येच्या घटनेने बदलापूरमधील गुन्हेगारी समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कधी मराठी हिंदी भाषिक वाद, तर कधी अत्याचार व हत्या, या घटनांनी ठाणे जिल्हा चर्चेत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment