प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी संपली:जामीन मिळणार की नाही? दोन दिवसांनी कळणार, न्यायालय 9 एप्रिला देणार निर्णय

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान प्रकरणी प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सहा दिवसांपूर्वी कोल्हापूर न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यावर कोरटकर याने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्यासमोर सुनावणी झाली असून जामिनाबाबतचा निर्णय परवा दिला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशांत कोरटकरचा कारागृहातील मुक्काम 9 एप्रिलपर्यंत वाढला आहे. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर इंद्रजीत सावंत यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या प्रकरणाचा अद्याप तपास पूर्ण झाला नाही, तसे पोलिसांनीही लेखी लिहून दिले आहे. त्यामुळे तपास अपूर्ण असताना प्रशांत कोरटकरला जामीन देणे योग्य नाही, असे आम्ही कोर्टात सांगितल्याचे असीम सरोदे म्हणाले . असीम सरोदे म्हणाले की, आरोपी प्रशांत कोरटकरच्या वतीने वारंवार विविध न्यायालयांमध्ये जामीन मिळवण्यासाठी अर्ज करण्यात येत आहेत. सर्वच न्यायालयांनी प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज आतापर्यंत फेटाळला आहे. आता सुद्धा केलेला जामीन अर्ज अत्यंत घाईत आणि जामीन मिळालाच पाहिजे, असा दुराग्रह ठेवून केलेला असल्याचे दिसते. या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झाला नाही, असे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी देखील लेखी स्वरुपात दिलेले आहे. प्रशांत कोरटकरला वेगवेगळ्या राज्यांमध्ये, तिथल्या सहा शहरांमध्ये जेव्हा लपून बसला होता, तेव्हा त्याला कुणी-कुणी मदत केली? त्या सर्वांचे स्टेटमेंट्स घेणे आवश्यक आहे. कोरटकरकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तपास अपूर्ण असताना प्रशांत कोरटकर जामीन देणे योग्य नाही, याची मांडणी आम्ही आज कोर्टात केली. या केसच्या संदर्भातला घटनाक्रम आणि वस्तुस्थिती आपण पाहिली, तर असे दिसते की, प्रशांत कोरटकरला जेव्हा इंद्रजीत सावंतांना फोन करावा वाटला, तेव्हा त्यांना त्याने रात्री 12 वाजेनंतर फोन केला. फोन करून त्याने इंद्रजीत सावंतांना शिवीगाळ केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वाईट भाषा वापरत वक्तव्ये केली. प्रशांत कोरटकरकडून मराठा आणि ब्राह्मण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही पहिली वस्तुस्थिती आहे, असे असीम सरोदे म्हणाले. गुन्हेगारी कौशल्य असलेल्या माणसाला जामीन देऊ नये प्रशांत कोरटकरला त्याच्याच अर्जानुसार पोलिस संरक्षण देण्यात आले होते. त्या पोलिस संरक्षणातून सुद्धा कोरटकर पलायन करतो. हे त्याचे कौशल्य बघितले आहे. त्यानंतर त्याने जेव्हा नागपूर पोलिसांकडे मोबाईल जमा केला, तेव्हा त्यातील सर्व डेटा डिलीट करण्याची त्याने काळजी घेतली. त्यामध्येही त्याचे गुन्हेगारी कौशल्य आपल्याला दिसले. अशा गुन्हेगारी कौशल्य असलेल्या माणसाला जामीन देऊ नये, असे आम्ही आज कोर्टात सांगितले. न्यायालय परवा जामीन अर्जावर निकाल देणार आहे, असे इंद्रजीत सावंत यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले. हे ही वाचा… प्रशांत कोरटकरचा पाय खोलात:वकील असीम सरोदे यांनी कोल्हापूर कारागृहाच्या पत्त्यावर बजावली अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा कथित अवमान केल्याचा आरोप केल्याप्रकरणी वकील असीम सरोदे यांनी सोमवारी कथित पत्रकार प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कारागृहाच्या पत्त्यावरच अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. यामु्ळे कोरटकरचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे. पूर्ण बातमी वाचा…