हनुमान जन्मोत्सवानिमित्त एमआयटी डब्ल्यूपीयूत कुस्तीचे आयोजन:100 पैलवानांचा सहभाग, ऑगस्टमध्ये होणार कुस्ती परिषद

बलवान आणि बुद्धिमान असा उल्लेख असलेल्या मल्ल विद्येला संजीवनी देण्यासाठी ऑगस्ट मध्ये एमआयटी डब्ल्यूपीयूत कुस्ती परिषदेचे आयोजन करण्याचे नियोजन आखले आहे असे मत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केले. हनुमान जन्म उत्सव निमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या आखाड्यात विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी तर्फे पुण्यातील पैलवानांसाठी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हेाते. त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत जवळपास १०० पैलवानांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. उद्घाटनाची ८६ किलो वजनी गटात एमआयटी आखाड्यातील अनुदान चव्हाण आणि सूरज सावंत यांच्यात सलामीची लढत झाली. ज्यात अनुदान चव्हाण हा विजयी झाला. प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांनी एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात असलेल्या हनुमान मंदिरात महापूजा केली. या नंतर कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस.एन.पठाण, सरकार निंबाळकर, डॉ. टी.एन.मोरे, विश्वजीत नागरगोजे, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक व पंच प्रा. विलास कथुरे, वैभव वाघ, प्रा. अभय कचरे, रोहित बागवडे, राहुल बिराजदार, पै. निखिल वणवे व बाळू सणस उपस्थित होते. प्रा.कराड म्हणाले, कुस्तीमुळे ताकद आणि रणनीती विकसित होते. विद्यार्थ्यांनी व्यायामाबरोबरच अभ्यास करावा. बुध्दी आणि शक्तीच्या जोरावर कुस्ती क्रीडा प्रकारात यश मिळविता येते. डॉ. पठाण म्हणाले, भारतीय संस्कृतीत मल्ल विद्या आहे. त्याचे जतन ग्रामीण व शहरी भागात थोड्या फार प्रमाणात होताना दिसत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणत असे की, ज्या गावात हनुमानचे मंदिर व तालिम नाही त्या गावात मी कधीही जाणार नाही. मल्ल विद्येबरोबर ज्या व्यक्तिचे आचार विचार चांगले आहेत तोच खरा व्यक्ती आहे.