उमेद ठेवा वाचनाची, झळाळी वाढेल जीवनाची:चापडगावात जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढली वाचन जनजागृती फेरी

मोबाईल फोन दूर करा, पुस्तक वाचनाने मेंदू भरा, नको मला खाऊ, पुस्तक द्या हो भाऊ, उमेद ठेवा वाचनाची, झळाळी वाढेल जीवनाची, पुस्तकाला हाय, असे घोषवाक्य असलेले फलक हाती घेत शेवगाव तालुक्यातील चापडगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शनिवारी गावातून ताशा व झांज या वाद्यांच्या तालावर वाचन जगजागृती फेरी काढली. शेवगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.शंकरराव गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत ताशावादक असद शेख व झांजवादक रोहित हराळकर यांनी वादन केले. विद्यार्थ्यांनी या फेरी दरम्यान मोबाईलला बाय, वाचनाची वाढवा गोडी, कळतील जगातील घडामोडी, पुस्तक म्हणजे मेंदूचा मेवा, वाचन वाढवून आनंदी ठेवा, ताई आक्का विचार करा, मोबाईल सोडा पुस्तक धरा, ताणतणाव होईल कमी, पुस्तक वाचनाने मिळेल हमी, मोबाईल करी डोळे अधू, पुस्तक वाचून संधी साधू, घरोघरी धरा आग्रह, पुस्तकांचा करा संग्रह, वाचा वाचा, अशा आशयांच्या घोषणा दिल्या. शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकरराव गाडेकर फेरी चालू असताना चालता बोलता नमस्कार करत वाचनाचे महत्त्व पटवून देत होते. बाजार तळात पोहोचल्यावर गोल रिंगण करून झांज ताशाच्या गजरात वाचनाचे महत्त्व सांगताना नागरिकही घोषणा ऐकत होते. मुलांच्या हातातील फलकांचे बारकाईने वाचन करून श्रवणाचाही आनंद घेत होते. ही फेरी प्राथमिक शाळेत आल्यानंतर मुख्याध्यापक तुकाराम भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पावली नृत्य घेण्यात आले. पावली नृत्यासाठी वर्षा कांबळे, सुनिता रोडे, सिंधू गमे यांनी परिश्रम घेतले. वाचन जनजागृती फेरी समारोप समारंभ शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सतीश गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. विद्यार्थी सुरज जगताप, तीर्थराज भिसे, कैवल्य गायकवाड, संचिता जाधव, दत्तू निर्मळ, रुद्राज पातकळ, हिंदवी मडके, रोहित हराळकर, श्रुतिका पातकळ, गायत्री दिवटे, स्वामिनी जाधव आदी विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे वाचन करून कविसंमेलनच भरवले. याप्रसंगी शिक्षक कवी गवाजी बळीद यांनी मोबाइलचे दुष्परिणाम व वाचनाचे महत्त्व सांगणारा ‘मोबाइलचा पाळणा ‘ सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. निळकंठ आमले, संजय गितखने यांनी वाचनाचे महत्त्व पटवून दिले. शंकर गाडेकर व सतीश गोरे सर यांचा पुस्तक भेट देऊन शाळेतर्फे सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक तुकाराम भगत यांनी मानले.