सत्तेसाठी आम्हाला अमित शहा यांचे पाय चाटण्याची आवश्यकता नाही:संजय राऊत यांचे चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर

सत्तेसाठी आम्हाला अमित शहा यांचे पाय चाटण्याची आवश्यकता नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे सत्तेत येण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मात्र त्यांचा हा दावा संजय राऊत यांनी फेटाळला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. नाशिक मध्ये आगामी काळात होणाऱ्या विभागीय शिबिराची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. ठाकरेंच्या शिवसेनेची सत्तेत येण्याची इच्छा असल्याचा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. तसेच तसे झाले नाही तर त्यांना इतर ठिकाणी सोडा मुंबईतही उमेदवार मिळणार नसल्याचेही पाटील यांनी म्हटले होते. त्यांच्या या टीकेला आता संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमच्याकडे उमेदवार असतील किंवा नसतील त्याची चिंता चंद्रकांत पाटील यांनी करू नये. त्यांनी स्वतःची चिंता करावी. आम्हाला शहांचे पाय चाटण्याची आवश्यकता नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या प्रमुख नेत्याने ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली आहे. त्याविषयी त्यांनी चिंता करावी, असा सल्ला देखील संजय राऊत यांनी दिला आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आपण म्हणतो. मात्र, याच महाराष्ट्रात फुले यांच्या चित्रपटाला विरोध होत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न का केला नाही? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीचा वाद मिटवला. मात्र फुले चित्रपटाचा वाद का मिटवू शकले नाही? असा असावा देखील त्यांनी उपस्थित केला. या चित्रपटाला केवळ ब्राह्मण समाजाचा विरोध असल्याचा दावा देखील त्यांनी केला. शिवसेनेचे विभागीय शिबीर नाशिक येथे 16 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागीय शिबीर नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार असून समारोप संध्याकाळी होणार आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. अनिल सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे, विनायक राऊत, अंबादास दानवे असे प्रमुख नेते या शिबिरात मार्गदर्शन करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. ज्येष्ठ कायदे तज्ञ असीम सरोदे देखील या शिबिरात मार्गदर्शन करणार असल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांचे मुंबई बाहेरील नाशिक मध्ये पहिले शिबिर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक भाषण या शिबिरात दाखवले जाणार आहे. हे भाषण कोणीही ऐकले नसेल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ते एक भाषण बनवलेले आहे. त्यामुळे एका पद्धतीने बाळासाहेब देखील नाशिक येथील शिबिराला उपस्थिती असेल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांचे मुंबई बाहेरील नाशिक मध्ये पहिले शिबिर आहे. नाशिकवर बाळासाहेब ठाकरे परिवाराचे विशेष प्रेम होते. त्यामुळे मुंबई बाहेर होणारे पहिले शिबिर नाशिक मध्ये आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ही शिबिरे आयोजित करण्यात आली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. असिम सरोदे यांचे मार्गदर्शन संविधान वाचवणे आणि नागरी स्वातंत्र्य संदर्भात असिम सरोदे यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. शिवसैनिकांवर अनेक खोटे खटले दाखल केले जात आहेत. त्या संदर्भात देखील त्यांनी वारंवार मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे असिम सरोदे यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन या शिबिरामध्ये आयोजित करण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी गुजरातच्या अधिवेशनातून नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला. मात्र राहुल गांधी हे दिल्लीत पोहोचायच्या आधीच नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राची संपत्ती जप्त करण्याचे आदेश काढण्यात आले. असल्याची टीका देखील राऊत यांनी केली. मोदी सरकारने दाऊदशी संबंधीत जप्त केलेली संपत्ती मुक्त केली प्रफुल्ल पटेल यांच्या संपत्तीचा व्यवहार दाऊद इब्राहिमच्या हस्तकासोबत झाला होता. मात्र, प्रफुल पटेल हे भाजपमध्ये गेल्याबरोबर मोदींनी त्यांची संपत्ती मुक्त केली. ही अकराशे कोटी रुपयांची संपत्ती आहे. एका बाजूला या देशात मोदी सरकार दाऊदशी संबंधीत जप्त केलेली संपत्ती मुक्त करत आहेत. तर दुसरीकडे पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यासाठी स्थापन केलेल्या वृत्तपत्राची संपत्ती जप्त करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. देशात असेच सुडाचे राजकारण चालू असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.