भास्कर ग्राउंड रिपोर्ट:केदार खाेऱ्यात दर अडीच मिनिटांनी एका हेलिकॉप्टरचे उड्डाण, 12 तासांत 304!, उच्च संवेदनशील क्षेत्रात एअर ट्रॅफिक लोड वाढला

केदारनाथ धाम हे एक अतिशय दुर्गम आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे. ११ हजार फूट उंचीवरील खोल व्ही-आकाराच्या अरुंद दरीतून हेलिकॉप्टर जातात. १२ वर्षांत या मार्गावर १० हेलिकॉप्टर अपघात झाले आहेत. यात ३० जणांचा जीव गेला. तरीही, यावेळी हवाई वाहतुकीचा भार इतका जास्त आहे की दर अडीच मिनिटांनी गुप्तकाशी, फाटा आणि शेरसी येथून एक हेलिकॉप्टर उड्डाण घेत आहे. केदार हेलिकॉप्टर सेवा नोडल कार्यालयानुसार, २ मे ते ६ जून या कालावधीत ४९१७५ भाविक हेलिकॉप्टर सेवेने गेले. ये-जा करताना ९ हेलिकॉप्टरच्या ८५३४ शटल ट्रिप (दररोज सरासरी २३७ उड्डाणे) झाल्या. केवळ ६ जूनबद्दल बोलायचे झाले तर ९ हेलिकॉप्टरने सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ३०४ उड्डाणे केली, हा विक्रम आहे. ५ जून रोजी २८७ उड्डाणे झाली. एका महिन्यातली चौथी घटना चारधाम यात्रेत हेलिकॉप्टर अपघाताची ही चौथी घटना आहे. पहिली घटना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गंगाणी येथे घडली, ज्यामध्ये ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. दुसरी घटना १२ मे रोजी बद्रीनाथ येथे घडली. तिसरी घटना १७ मे रोजी केदारनाथ येथील एम्स ऋषिकेशच्या हेलिकॉप्टरमध्ये घडली.
आधी ४ कंपन्या हेली सेवा देत होत्या, आता ९ प्रवास सुकर व सुरक्षित करण्यासाठी २००४ मध्ये अगस्त्यमुनीहून हेली सेवा सुरू करण्यात आली. २०१२ पर्यंत ४ कंपन्या ही सेवा देत होत्या, ज्या आता ९ पर्यंत वाढल्या. इतक्या वाहतुकीच्या भारानंतरही उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाने केदार परिसरात हवाई वाहतूक नियंत्रण टॉवरसाठी पुढाकार घेतला नाही. वाऱ्याची दिशा व दाब सांगणारी कोणतीही यंत्रणाही बसवली नाही. ज्यांच्या दुकानावर हेलिकॉप्टरचे पंखे आदळले ते दिनेश गजवन म्हणाले, जर हेलिकॉप्टर ५० मीटर पुढे पडले असते, तर कदाचित कोणीही वाचले नसते, कारण पुढे १०० मीटर खोल दरी आहे. माझ्या दुकानाचे छत उडून गेले. उत्तराखंड : हेलिकॉप्टरची रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग रुद्रप्रयाग। उत्तराखंडमधील केदारघाटीत वैमानिकाच्या सतर्कतेमुळे शनिवारी एक मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला. दुपारी १:०२ वा. क्रिस्टल कंपनीच्या हेलिकॉप्टरने बदासू हेलिपॅडवरून ५ भाविकांसह उड्डाण केले. परंतु ते दोन मीटर वर येताच त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. परिस्थिती लक्षात येताच ५५ वर्षीय वैमानिक रवींद्रसिंह सोधी यांनी रुद्रप्रयाग-गौरीकुंड महामार्गावरच हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग केले. त्या वेळी रस्त्यावर एक कार उभी होती. हेलिकॉप्टरची शेपटी कारला लागली तर पंख्यांमुळे रस्त्याच्या कडेच्या दुकानाचे छत उडाले. या अपघातात वैमानिकाच्या पाठीला दुखापत झाली, तर पाचही भाविक सुरक्षित आहेत. रवींद्र १० वर्षांपासून हेलिकॉप्टर उडवत आहेत. शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांनी १४ शटल केले होते. आम्ही मेरठचे आहोत. मी, माझी ११ वर्षांची मुलगी नव्या, माझा १५ वर्षांचा मुलगा व माझी ७१ वर्षांची सासू अनिता गर्ग हेलिकॉप्टरमध्ये होतो. सोबत आणखी एक प्रवासीही होता. माझे पती पुढच्या शटलने येणार होते. हेलिकॉप्टरने उड्डाण करताच लाल दिवा पेटला. पायलट शांत होता, पण घाम फुटला होता. हेलिकॉप्टर डगमगू लागले. मागचा भाग हेलिपॅडच्या कडेला आदळला व नंतर हेलिकॉप्टर रस्त्यावर पडले. जणू काही डोंगर कोसळला, असे वाटले. आम्ही घाबरलो. मुले ओरडू लागली. कोणीतरी गेट उघडून आम्हाला खाली उतरवले. आम्ही दर्शन न घेता मेरठला परतलो. ते एका मिनिटाचे दृश्य आम्ही कधीही विसरणार नाही. -मोनिका, हेलिकॉप्टरमधील प्रवासी