अजित पवार यांनी कोकाटे यांना घेतले फैलावर:वादग्रस्त वक्तव्य, जनता दरबाराला गैरहजेरी, बैठकीला उशीर; खडे बोल सुनावल्याची माहिती
महायुती सरकार मध्ये कृषी मंत्री झाल्यापासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील अनेकदा अडचणीत येताना दिसून येत आहे. त्यातच आता अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला देखील माणिकराव कोकाटे उशिराने पोहोचले. त्यामुळे अजित पवार त्यांच्यावर चांगलेच भडकले होते. या बैठकीत अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना चांगलेच फैलावर घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला माणिकराव कोकाटे अर्धा तास उशिराने पोहोचले होते. तोपर्यंत राष्ट्रवादीचे इतर नेते देवगिरी बंगल्यावर दाखल होऊन बैठकीला सुरुवात देखील झाली होती. मात्र, माणिकराव कोकाटे उशिरा पोहोचल्याने अजित पवार यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. आधीच माणिकराव कोकाटे हे प्रसार माध्यमांमध्ये वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने पक्ष अडचणीत येताना दिसून येत आहे. त्यात अजित पवार यांच्या बैठकीला देखील माणिकराव कोकाटे उशिरा पोहोचले. पक्षाच्या वतीने आयोजित जनता दरबारात देखील ते हजर राहत नाहीत. या सर्व बेशिस्त वर्तवणुकीवरून अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना खडे बोल सुनावल्या ची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. या बैठकीमध्ये राज्यातील विविध प्रश्नांबाबत तसेच प्रत्येक आमदाराच्या विधानसभा मतदारसंघातील कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. निधी अभावी कामे रखडत कामा नये, लोकांची गैरसोय होऊ नये, अशा सूचना अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना केल्या आहेत. त्याचप्रमाणे अधिक कार्यक्षम होण्यासाठी अजित पवार यांनी सर्वांना आग्रह केला. या बैठकी बाबत अजित पवार यांनी स्वतः एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर व्यक्त केली दिलगिरी काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफी विषयी विचारणा केली. त्यावर कोकाटे यांनी कर्जमाफीच्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का? असा सवाल करत शेतकऱ्यांनाच सुनावले होते. यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून टीका होत होती. टीकेची झोड उठल्यानंतर अखेर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.