अक्षय साधूसंत नव्हता, पण एन्काउंटर चुकीचाच:सुषमा अंधारेंचा सरकारवर घणाघात, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 5 पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अक्षय शिंदे हा कुणी साधूसंत नव्हता, पण एन्काउंटर चुकीचाच होता, असे त्या म्हणाल्या. आरोपीला शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे न्यायव्यवस्था आहे. परंतु, कुणाला तरी वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगनमताने अक्षय शिंदेचा खून केला, असा आरोपी त्यांनी केला. अक्षय शिंदे हा कुणी साधूसंत, समाजसुधारक, क्रांतीकारी नेता नव्हता. तशीही त्याला कायद्याने सुद्धा मरेपर्यंत फाशीचीच शिक्षा झाली असती किंवा व्हायला हवी होती. मात्र, ही शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे कायदा, न्यायालय आहे. ती शिक्षा देण्याचा अधिकार फक्त न्यायव्यवस्थेला आहे, असे म्हणत जबाबदार पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. हा एन्काउंटर फेक असल्याचे तेव्हाच सांगितले
बदलापूरमध्ये अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला होता तेव्हा पत्रकार परिषद घेऊन प्रश्न उपस्थित केले होते. या एन्काउंटर आक्षेप घेत अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे. पोलिसांच्या संगनमताने राजकीय लोकांनी घडवून आणलेली ती हत्या आहे, असे मी त्यावेळी म्हटल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले. एका आरोपीचा जीव घेण्यापर्यंत यांची मजल गेली
पुढे बोलतान सुषमा अंधारे म्हणाल्या की, फेक एन्काऊंटर करण्याची गरज सरकार पक्षाला होती. निवडणुका तोंडावर होत्या, ज्या पद्धतीने भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सरकारकडून वारंवार अक्षम्य चुका होत होत्या. स्वत:चे ग्लोरिफिकेशन करण्यासाठी, उद्दातीकरण करण्यासाठी एका आरोपीचा जीव घेण्यापर्यंत यांची मजल गेली, असा घणाघातही त्यांनी केला. नाकर्तेपणा झाकण्यासाठी उचलेले पाऊल आपण बघितले असेल या सगळ्यानंतर ज्या पद्धतीची बॅनरबाजी केली गेली. लाडक्या बहिणींना न्याय दिला गेला, लाडक्या बहिणींचा देवाभाऊ वगैरे हे सगळे ग्लोरिफाय करण्यासाठी, आपली काळवंडत चाललेली प्रतिमा उजळ करण्यासाठी अक्षय शिंदेचा जीव घेतला गेला, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला. स्वत:चा नाकर्तेपणा हे झाकण्यासाठी, महिलांना न्याय देऊ शकत नाही, हा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अगतिकतेने आणि अतार्किकपणे उचलेले पाऊल आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले. पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानते की, या निमित्ताने त्यांनी सरकार आणि पोलिस यांचे संगनमत उघड झाले आहे. अक्षय शिंदेने ज्या बंदुकीतून गोळी झाडली, त्या बंदुकीवर त्याच्या बोटांचे ठसे बंदुकीवर नाहीत, असे फॉरेन्सिकचा अहवाल सांगतो. अजून कुणाला तरी वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जाणवीपूर्वक पोलिसांच्या संगनमताने अक्षय शिंदेचा खून केला, असा याचा स्पष्ट अर्थ आहे, असे म्हणत जबाबदार पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली. हे ही वाचा… फेक एन्काउंटर करून संस्था चालकाला वाचवण्याचा प्रयत्न:विजय वडेट्टीवारांचा आरोप, म्हणाले – पोलिसांइतकीच शिंदे आणि फडणवीसांची जबाबदारी बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजप संस्था चालकांवर कारवाई झालीच नाही तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर करून भाजपशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आले, असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केला, असेही ते म्हणाले. मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. सविस्तर वाचा…