सर्व दोषी पकडले गेले पाहिजेत:संतोष देशमुखांवर झालेल्या टॉर्चरप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल व्हावा, खासदार सोनवणे यांची मागणी
सर्व दोषी पकडले गेले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेच आहेत की आम्ही कोणालाही सोडणार नाही. तसेच आदेश तपास यंत्रणेला देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिस यातील सर्वच आरोपींचे कॉल डीटेल काढून कारवाई करतील, असे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले आहेत. त्यात आता वाल्मीक कराडच्या कुटुंबीयांनी तसेच समर्थकांनी आंदोलन सुरू केले आहे. कराडच्या आईने देखील यात सहभाग घेतला आहे. यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला असून यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, तणाव वगैरे काही नाही. लोकशाही पध्दतीने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तणाव काय असणार आहे, याआधी पण बरेच गुन्हे असे झाले आहेत, अनेक जण जेलमध्ये जाऊन आले आहेत. त्यामुळे तणाव वगैरे काही नाही. पोलिसांना सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. आम्ही देखील जे पोलिस एकतर्फा वागत आहेत त्यांच्यावरच आम्ही बोलतो. पुढे बोलताना बजरंग सोनवणे, तपास हा विषय तपासाच्या दिशेने झाला पाहिजे. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने क्रूर हत्या झाली त्यात आम्हाला न्याय पाहिजे. त्यांच्यावर जे टॉर्चर करण्यात आले त्याचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे मी म्हणले. यात आता आणखी बरेच जणांवर गुन्हा दाखल होत आहे. यात जेवढे कोणी असतील त्या सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कोणत्या हॉटेलवर राहिले, कुठे कुठे गेले, या बऱ्याच गोष्टी तपासायच्या आहेत. पोलिस तपास करत आहेत. एसआयटीचा जो तपास सुरू आहे त्यात जेव्हा सगळे आरोपी यात येतील तेव्हा यावर बोलले पाहिजे. आज यांचा तपास सुरू असताना आपण त्यावर समाधानी बोलण्यापेक्षा तपास पूर्ण झाल्यानंतर यावर बोलणे योग्य आहे. वाल्मीक कराडच्या आईवर बोलणे योग्य नाही. प्रत्येकाच्या आईचे मन हळवे असते, त्यांच्यावर मी बोलू शकत नाही. तसेच जे लोक आंदोलन करत आहेत त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखूनच आपण वागावे, असा सल्ला देखील बजरंग सोनवणे यांनी दिला आहे.