अंजलीताई, फडणवीस-शिंदेंना सेफ का करता?:सुषमा अंधारेंचा सवाल, पत्रकार परिषदेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप

अंजलीताई, फडणवीस-शिंदेंना सेफ का करता?:सुषमा अंधारेंचा सवाल, पत्रकार परिषदेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री असताना पावणे तीनशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मात्र, या पत्रकार परिषदेतून धनजंय मुंडेंना लक्ष्य करताना, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेफ करण्याचा प्रयत्न दमानिया यांच्याकडून केला जातोय का? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. तसेच या पत्रकार परिषदेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपीही त्यांनी केला. सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यांनी अंजली दमानियांच्या पत्रकार परिषदेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच पत्रकार परिषदेतील एक वाक्यावर आक्षेप घेत या पत्रकार परिषदेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
पत्रकार परिषदेत बोलताना आज दमानिया देवेंद्र फडणवीस आणि तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका सेफ झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न का करत होत्या ते कळलं नाही, असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. अंजली दमानियांच्या लढ्याबद्दल कौतुकच. पण आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, “… एक डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि तोही कराडच ” हे वाक्य पत्रकार परिषदेला जातीय रंग देणारे आहे याचे कृपया त्यांना भान असावे. वाल्मीक कराड किंवा या हत्या प्रकरणाशी संबंधित जो जो गुन्हेगार आहे त्या प्रत्येकाला फाशीच व्हायला हवी. मात्र कराड नावाची प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच असते हा चष्मा काढून टाका. कारण मग या न्यायाने आपण वि. दा. कराड यांना सुद्धा गुन्हेगार ठरवायला मागेपुढे बघणार नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फोकस हलू नये यासाठी ही मांडणी महत्वाची आहे, असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंवरील आरोप काय?
धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना कृषी खात्याने केंद्र सरकारचे आदेश धाब्यावर बसवले. शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दिले नाहीत. तर या प्रक्रियेला वगळून महाबीज, केव्हीके आणि एमएआयडीसीच्या योजनांसाठी उपकरण खरेदी केली. त्यासाठी चक्क टेंडर काढले. बाजारभावाच्या दुपटीने खरेदी केली. विशेष म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः पाठपुरावा करून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या यादीतून काही गोष्टी वगळायला लावल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. 577 रुपयांच्या बॅग 1200 रुपयांना तर 2400 रुपयांचे पंप साडेतीन हजार रुपयांनी खरेदी करण्यात आले. एक वर्ष त्यांच्याकडे हे खाते असताना शेतकऱ्यांचा इतका अफाट पैसा मुंडेंनी खाल्ला. आता त्यांना मंत्रिपदावर ठेवायचे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायले हवे. 92 रुपयांची नॅनो युरियाची बाटली ही 220 रुपयांना खरेदी केली. त्यांच्या कार्यकाळात नियमाबाहेर जात काम झाले आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या होत्या. धनंजय मुंडे यांनी अंजली दमानियांचे आरोप फेटाळले
दरम्यान, अंजली दमानिया यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. हे केवळ त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले गेले आहेत. कृषी विभागात मी मंत्री असतानाच्या काळात झालेली सर्व खरेदी ही शासन नियमानुसारच झाली असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. सनसनाटी, धादांत खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवायची, याव्यतिरिक्त याच्यात मला काहीही आढळत नसल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. गेल्या 59 दिवसापासून माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे. ते का चालू आहे? कोण चालवतेय? हे मला माहिती नाही, असे देखील मुंडे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी अंजली दमानिया यांचा अंजली बदनामिया असा उल्लेख करत टोला हाणला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment