अपोलोचा अहवाल; 25 लाख लाेकांची तपासणी:26% जणांना बीपी, 66% फॅटी लिव्हर, लक्षणे नाहीत

भारतात लाखो लोक उच्च रक्तदाब, मधुमेह व फॅटी लिव्हरसारख्या आजारांसह जीवन जगत आहेत. विशेष म्हणजे त्यांना याची कल्पनाही नाही. अपोलो रुग्णालयाच्या ‘हेल्थ ऑफ द नेशन-२०२५’ अहवालातून ही माहिती समोर आली. २०२४ मध्ये रुग्णालयात २५ लाख लोकांनी आरोग्य तपासणी केली होती. त्यापैकी २६ टक्के लोकांना उच्च रक्तदाब, २३ टक्के जणांना मधुमेह तर ६६ टक्के लोकांना फॅटी लिव्हरची समस्या दिसून आली. परंतु त्यांच्यात याबद्दलचे कोणतेही लक्षण आढळून आले नव्हते. ही बाब एक मूकमहामारी दर्शवणारी आहे. मद्यपान न केलेल्या ८५ टक्के लोकांना फॅटी लिव्हरची समस्या होती. ४५ टक्के महिला, २६ टक्के पुरुषांत रक्ताल्पता दिसली. ७७ टक्के महिला, ८२ पुरुषांत व्हिटॅमिन डी, ३८ टक्के पुरुष व २७ टक्के महिलांत व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता दिसली. यात चाळीस वय नसलेल्यांचे प्रमाण जास्त होते. महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांत लठ्ठपणा, प्री-हायपर्टेेन्सिव्ह लक्षणे
फॅटी लिव्हर: २.५७ लाख लोकांत निकृष्ट आहार, निष्क्रिय जीवनशैली व पोटासंबंधी समस्यांमुळे या समस्या दिसल्या.
रजोनिवृत्ती: तपासणी झालेल्या महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतरच्या मधुमेहाची जोखीम ४० टक्के, लठ्ठपणा-८६ टक्के आहे. तो रजोनिवृत्तीवेळी अनुक्रमे १४ टक्के, ७६ टक्के होता. त्यानंतरची फॅटी लिव्हरची समस्याही होती. लठ्ठपणा : देशातील प्राथमिक विद्यालयांतील ८ % व काॅलेजातील २८% विद्यार्थ्यांचे वजन जास्त आहे. त्यातही कॉलेजातील १९% मुले प्री-हायपर्टेंसिव्ह आहेत. हे हृदयरोगाच्या धोक्याचे प्राथमिक संकेत असतात. ही स्थिती वाईट आहार, शारीरिक हालचाली कमी असणे व तणावामुळे निर्माण होते. २५ लाखांत ६१ % लठ्ठ होते. १८% कमी वजनाचे होते.
हृदयरोग: अहवालानुसार आजाराची लक्षणे नसलेल्यांची कॅल्शियमची तपासणी केली गेली. त्यात ४६ टक्के जणांत ह्रदयरोगाची प्राथमिक लक्षणे आढळली. धक्कादायक म्हणजे त्यातही २.५% लोक ४० वर्षांहून कमी वयाचे आहे.
मानसिक आरोग्य : ४७ हजार लोकांच्या तपासणीत ६ %मध्ये डिप्रेशन आढळून आले. बहुतांश ४० ते ५५ वर्षीय महिला होत्या. प्रत्येकी ४ पैकी एका रुग्णास स्लीप ॲप्नियाची उच्च जोखीम असून लठ्ठपणा, हृदयरोगासंबंधी आहे.