बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण:मुलगा झिशानची बिल्डर लॉबीवर शंका, मुंबई पोलिस काहीतरी लपवत असल्याचा केला आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईला क्लीन चिट दिली आहे. त्याचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई हा या प्रकरणाचा खरा सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. मात्र बाबा सिद्दिकींचा मुलगा झीशान सिद्दिकी यांनी चार्जशीटवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबई पोलिस खरा खुनी आणि हत्येचे खरे कारण लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे झीशानचे म्हणणे आहे. तसेच मी शंका असणाऱ्या अनेकांची नावे पोलिसांना सांगितली असून त्यांची पोलिसांनी चौकशी का केली नाही? असा सवालही झिशान यांनी केला आहे. लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यावर संपूर्ण ठपका ठेवून मुंबई पोलिस प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे झीशान सिद्दीकी यांचे म्हणणे आहे. तर ज्या बिल्डर लॉबीवर त्यांनी संशय व्यक्त केला त्यापैकी एकाही व्यक्तीची आजपर्यंत चौकशी झालेली नाही. बाबा सिद्दीकी हत्येचे खरे सूत्रधार पोलिसांच्या हाती लागले नसताना, पोलिसांना हत्येचे कारण कसे सापडले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई हा या हत्याकांडातील मास्टरमाईंड असल्याचा दावा या आरोपपत्रात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईला क्लीन चिट दिली आहे. आरोपपत्रात त्याचे नाव कुठेही नाही. त्यानंतर आरोपपत्राबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनमोल बिश्नोईने बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे का?, असा थेट सवाल झीशानने मुंबई पोलिसांना विचारला आहे. पोलिसांनी बाबा सिद्दिकी हत्याकांड प्रकरणात 4590 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यात या हत्येसाठी एकूण 29 जणांना दोषी ठरवले आहेत. त्यातील 26 जणांना अटक केली आहे. तर मोहम्मद यासीन अख्तर उर्फ सिंकदर, शुभम लोणकर आणि अनमोल बिश्नोई हे फरार आहेत. याप्रकरणात पोलिसांनी 180 साक्षीदार तपासले आहेत.