भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होवू शकलो:धर्मासोबत राहणारा जिवंत राहील, विरोधात जाणाऱ्यांचे काही खरे नाही – गुलाबराव पाटील

भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होवू शकलो:धर्मासोबत राहणारा जिवंत राहील, विरोधात जाणाऱ्यांचे काही खरे नाही – गुलाबराव पाटील

सध्या जो धर्माबरोबर राहील तो जिवंत राहील. धर्माच्या विरुद्ध राहील त्याचे काही खरं नाही. त्यामुळे धर्मकार्य आणि भगवा झेंडा यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणे ही काळाची गरज आहे, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे एका कीर्तनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होवू शकलो, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. धर्म टिकला नाही, तर जात कुठून टिकणार? मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण किती जातीपातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत आणि मग इतर जातीचे आहोत. हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल. हिंदू धर्म टिकणार नाही तर जात कुठून टिकणार? त्यामुळे धर्म सेवा सुरू आहे. या धर्मसेवेला आपण सगळे मदत करत राहतो. पुढच्या काळातही आम्ही येथे मदत करण्याचा प्रयत्न करू. कारण या भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो याचा मला अभिमान आहे. आधी हिंदू मग मंत्री गुलाबराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, निवडणूक पाहिली तर भगवे एका साईडला होते आणि बाकीचे सर्व एका साईडला होते. त्यामुळे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की, या निवडणुकीत आपल्याला किती मेहनत करावी लागली. मी मंत्री जरी असलो तरी मी पहिले हिंदू आहे. त्यामुळे मला माझ्या धर्माचा निश्चितपणे अभिमान आणि गर्व आहे आणि तो प्रत्येकाला असणे हे काही चुकीचे नाही. विधानसभा निवडणुकीतही हिंदुत्वाचा मुद्दा
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रचंड गाजला होता. भाषपकडून तर बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है अशा घोषणाच देण्यात आली होती. याच घोषणांवर महाराष्ट्रातील निवडणुका पार पडल्या. शिवसेना शिंदे गटाने देखील याच घोषणांचा आधार घेत आपला प्रचार केला. परिणामी धार्मिक मुद्द्यांवरून केलेले ध्रुवीकरण महायुतीला फायद्याचे ठरले होते. महायुतीला एकूण 230 जागांवर विजय मिळाला. आता शिंदे गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने अशाप्रकारे धर्माच्या आधारावर वक्तव्य केल्याने आता त्यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment