भाजपमध्ये जातीचे सेल अयशस्वी:निवडणुकीत तिकिटासाठी पन्नास जाती धावतात, मग प्रदेशाध्यक्ष सेल बंद करतात- नितीन गडकरी

नागपूर – भाजपच्या प्रस्तावित कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीय सेलबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले. ते म्हणाले की निवडणुकीच्या वेळी एका तिकिटासाठी पन्नास जातींचे लोक धावतात. मग प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जातीचे सेल बंद करण्याची भाषा करतात. गडकरी यांनी स्वतःचा अनुभव सांगताना म्हटले की, ते प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी अनेक जातींचे सेल सुरू केले होते. अनेकांनी त्यांना विरोध केला, पण सर्व जाती जोडण्याच्या उद्देशाने त्यांनी हे सेल सुरू ठेवले. मात्र या सेलमुळे कोणतीही जात पक्षाशी जोडली गेली नाही. उलट, जे जातीचे नेते भाजपमध्ये आले, त्यांना त्यांच्या जातीतील लोकच विचारत नव्हते. नव्या कार्यालय इमारतीत पार्किंगसाठी दोन बेसमेंट आणि नऊ मजले असतील. हे कार्यालय नागपूर शहर, जिल्हा आणि संपूर्ण विदर्भासाठी असेल. गडकरी यांनी कार्यकर्त्यांबद्दलही महत्त्वाचे विचार मांडले. ते म्हणाले की नेते आपल्या मुलांसाठी तिकीट मागतात, पण कार्यकर्त्यांवरही मुलांसारखेच प्रेम केले पाहिजे. आणीबाणीच्या काळातील आठवणी सांगताना गडकरी म्हणाले की, डॉ. ढवळे यांच्या मालकीच्या जागेत भाजपाचे कार्यालय होते. भाडे न दिल्याने ते संघ कार्यालयात भाडे मागायला गेले होते. वादळात भाजपा कार्यालयाचा बोर्डही उडून गेला होता.1952 पासून कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या संघर्षामुळेच आज चांगले दिवस आले आहेत, याची जाणीव ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. अलीकडे मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यात आरक्षणावरून संघर्ष निर्माण झाला आहे. जातीय अस्मिता बळावू लागल्या आहेत. एखाद्याचे तिकीट कापले तरी अन्यायाचे अस्त्र उगारले जात आहे. भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असल्याने याच पक्षाला त्याची सर्वाधिक झळ बसत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व घडामोडी बघता नितीन गडकरी यांनी केलेल्या सूचनेवर आता भाजप काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. गडकरी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे नाव घेऊन या गंभीर बाबीकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.