लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी:26 तारखेच्या आधी मिळणार जानेवारीचा हप्ता, आदिती तटकरे यांची माहिती
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा जानेवारीतील हप्ता 17 दिवस झाले, तरी अद्याप खात्यात आला नाही. लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्यातील पैसे मिळाले आहे. मात्र, जानेवारी महिन्याचे पैसे कधी येणार, याची लाभार्थी महिला वाट पाहत आहेत. येत्या 26 जानेवारीच्या आधी लाडक्या बहिणींना मिळतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 च्या जुलै महिन्यात सुरू केली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. आतापर्यंत लाडक्या बहिणींना डिसेंबरपर्यंतचे पैसे मिळाले आहेत. जानेवारी महिन्याचे पैसे देखील लवकरच खात्यात जमा होणार आहेत. दरम्यान, महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार या योजनेचे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही मोठी माहिती दिली आहे. 2100 रुपये कधी मिळणार?
लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांप्रमाणे पैसे येतील, असे भाजप आमदार चित्रा वाघ म्हणाल्या. आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेबाबत दिलेले आश्वासन आम्ही लवकरच पूर्ण करू. या योजनेमुळेच महिलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळून दिले आहे. त्यामुळे लवकरच आता त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला 2100 रुपयांप्रमाणे पैसे येतील, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. दरम्यान, आगामी अर्थसंकल्पामध्ये आणि त्यानंतरच्या काळात याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. अर्जांची सरसकट छाननी नाही
दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करून त्यातील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. परंतु, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांनाच या योजनोचा लाभ घेता येणार आहे. सध्या सरसकट छाननी होणार नाही. केवळ स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या अर्जाबाबत तक्रार दिली केवळ त्या अर्जांची पडताळणी करणार, असे अदिती तटकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. हे ही वाचा… लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती:शासनावर आर्थिक बोजा पडणार नाही, राज्य सरकारकडून कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरील एका जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू आहे. यावेळी राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रातून आपली बाजू मांडली आहे. या योजनेमुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही, असे या पत्रात राज्य सरकारने म्हंटले आहे. सविस्तर वाचा…