छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवले:मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; युवराज संभाजीराजेंचीही नाराजी
अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला छावा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, या चित्रपटांमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना एकत्र नृत्य करताना दाखवले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शन झाला आहे. आता या ट्रेलरवरून वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छावा संघटना तसेच मराठा क्रांती मोर्चाने या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे, तर माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी देखील यावर नाराजी व्यक्त करत आपली भूमिका मांडली आहे. दिग्दर्शक उतेकर भेटले, पण… छावा चित्रपटाबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, छावा या नावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे, ही आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट तयार करणे हेच खूप मोठे धाडस आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यातून जगासमोर येईल. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे मला येऊन भेटले होते. त्यांनी ट्रेलरची क्लिप मला दाखवली आहे. पण मी पूर्ण चित्रपट दाखवण्याची मागणी केली होती. माझ्यासोबत काही इतिहासकार यांना देखील पूर्ण चित्रपट दाखवण्याची मागणी माझी होती. त्यानंतर या चित्रपटात काही चूक असेल तर ते दुरुस्त करता येईल, असे माझे मत होते. मात्र इतिहासकारांना भेटण्यास त्यांनी स्वारस्य दाखवले नसल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. चर्चा करून मार्ग काढू या संदर्भात संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, दिग्दर्शक उतेकर यांनी शंभर ते दोनशे कोटी रुपये खर्च करून संभाजी महाराजांवरील हिंदी चित्रपट तयार केला आहे. या माध्यमातून महाराजांचा इतिहास आज जगभरात जाणार आहे. मात्र, ट्रेलर मध्ये महाराजांना नृत्य करताना दाखवल्यामुळे लोकांना ते कितपत पटेल याबाबत माझ्या मनात शंका असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आम्ही आणि राज्यातील इतिहासकार बसून यावर चर्चा करून मार्ग काढू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. मराठा क्रांती मोर्चाचा विरोध ‘छावा’ या चित्रपटातील ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे नृत्य करतानाचे दृष्य दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने या चित्रपटास विरोध दर्शवला आहे. तसेच या चित्रपटाला छावा संघटना, तृप्ती देसाई आणि संभाजीराजे यांनीही विरोध दर्शवल्यामुळे चित्रपट प्रदर्शीत होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.