सायबर गुन्ह्यांबाबत धक्कादायक माहिती:समाजाच्या दोषारोपणामुळे 92 टक्के महिला सायबर गुन्ह्यांविषयी मौन; तज्ज्ञांचा इशारा
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणाबाबत गंभीर चिंता व्यक्त करत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. वैशाली भागवत यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत. श्री देवदेवेश्वर संस्थानच्या सारसबाग मंदिरात आयोजित ‘डिजिटल व सायबर क्राईम’ या विषयावरील व्याख्यानात त्यांनी ही माहिती दिली. अॅड. भागवत यांनी सांगितले की, समाज माध्यमांवरील चॅटिंग आणि गेमिंग साईट्समुळे मुले आणि महिलांवरील लैंगिक अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे समाजाकडून होणाऱ्या दोषारोपणामुळे ९२ टक्के महिला या गुन्ह्यांबद्दल बोलण्यास धजावत नाहीत. ज्येष्ठ नागरिकही या गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत. त्यांनी विशेष इशारा देताना सांगितले की, भारतासारख्या देशात सेक्शुअल टुरिझमचे प्रमाण वाढत असून, परदेशी गुन्हेगार सोशल मीडियाच्या माध्यमातून सहजपणे मुलांपर्यंत पोहोचू शकतात. आधार कार्डवरील संवेदनशील माहितीच्या गैरवापराबाबतही त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला. श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत यांनी तंत्रज्ञानाच्या जबाबदार वापराचे आवाहन केले. सायबर गुन्हे आणि कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी संस्थानतर्फे भविष्यात अधिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमास संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत आणि आशिष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.