देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला:चाळीसगावच्या घाटात पिकअप वाहनाचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी

चाळीसगाव येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कन्नड घाटाच्या पायथ्याला हा अपघात झाल्याचे समजते. वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून यात तिघांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. या घटनेबाबत अधिकची माहिती अशी, जळगावच्या चाळीसगाव येथील कन्नड घाटाच्या पायथ्याशी पिकअप वाहनाचा अपघात झाला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप कठड्याला जाऊन धडकले. ही धडक इतकी भीषण होती की यात तिघांचा मृत्यू झाला. तसेच पाच प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत, तर वाहनातील इतर आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत आणि जखमी सर्व एकाच कुटुंबातील असल्याचे समजते तसेच हे सर्व देवदर्शनाहून परतत असताना हा अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरकडून चाळीसगावकडे जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिस आणि ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. करंबळेकर यांनी दिली आहे. या आपघातमुळे कन्नड घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. तसेच या अपघातात वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.