प्रत्येक जोडप्याला 3 अपत्ये असावीत:लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको, डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
नागपूर येथे कठाळे कुल संमेलनात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मोठे विधान केले आहे. लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको. त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे किमान तीन अपत्ये असावेत, असे भागवत म्हणाले आहेत. या संमेलनात मोहन भागवत यांच्याआधी बोलणाऱ्या वक्त्याने आजकाल तरुण दांपत्य एकही अपत्य जन्माला घालत नसल्याची चिंता व्यक्त केली होती. याच विषयाला अनुसरून बोलताना मोहन भागवत म्हणाले, नक्कीच सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचे दर 2.1 पेक्षा खाली गेले, तर तो समाज नष्ट होतो, तो समाज जगाच्या पाठीवर नसतो, त्याला कोणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले असल्याचे मोहन भागवत म्हणाले. पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले, आपल्या देशाची लोकसंख्या नीती वर्ष 2000 च्या जवळपास ठरली. त्याच्यातही असेच सांगितले आहे की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली राहू नये. पॉइंट एक तर माणूस जन्मतच नाही. मग जर 2.1 एवढे लोकसंख्या वाढीचे दर पाहिजे, तर अपत्य कमीत कमी 3 असावीत. तसेच हिंदूंच्या संख्येत 7.8 टक्क्यांनी घट झाली असल्याचेही मोहन भागवत यांनी सांगितले. मोहन भागवत म्हणाले, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने 1950 ते 2015 या काळात भारतात हिंदू बहुसंख्य होते, असे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे आता हिंदूंची लोकसंख्येत 7.8 टक्क्यांनी घट झाल्याचेही स्पष्ट केले आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये त्या देशातील प्रमुख धर्मियांची लोकसंख्या वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार माहिती देताना मोहन भागवत म्हणाले, भारतात बौद्ध धर्मियांच्या संख्येत वाढ झाली आहे. 1950 ते 2015 या काळात मुस्लिमांच्या लोकसंख्येत 43.15 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर ख्रिश्चन समाजाच्या लोकसंख्येत 5.38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच शीख धर्मियांच्या लोकसंख्येतही 6.58 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती मोहन भागवत यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीने जगभरातील 167 देशांत 1950 ते 2015 या कालावधीत लोकसंख्येत होत असलेल्या बदलांचा अभ्यास केला आहे. त्यानुसार 1950 साली भारतातील हिंदूंच्या लोकसंख्येचा वाटा 84 टक्के होता, तो आता 2015 साली 78 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. तर मुस्लिमांचा 1950 मध्ये असलेला वाटा 9.84 टक्के होता, तो आता 14.09 टक्क्यांवर आला असल्याची माहिती मोहन भागवत यांनी दिली.