नाटकांवरील जीएसटीचा प्रश्न शरद पवारांनी 10 सेकंदात सोडवला:अभिनेते परेश रावल यांनी सांगितला किस्सा, म्हणाले – हे आहेत मराठी लोक

अभिनेते परेश रावल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले आहे. नाटकांवरील जीएसटीचा प्रश्न बरेच दिवस सुटत नव्हता. परेश रावल यांनी शरद पवारांना विनंती केली आणि अवघ्या दहा सेकंदात तो प्रश्न सुटला. असे सांगत परेश रावल यांनी त्यांच्या कार्यक्षमतेची आणि मराठी माणसाच्या ताकदीची जाहीरपणे प्रशंसा केली आहे. नाटक क्षेत्रावर लावण्यात आलेल्या वस्तू व सेवा कराच्या (GST) प्रश्नामुळे अनेक कलावंत आणि निर्माते त्रस्त होते. हा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित होता, पण तो मार्गी लावण्यासाठी परेश रावल यांनी थेट शरद पवार यांची मदत मागितली. “मी शरद पवारांना भेटून हा विषय मांडला आणि अवघ्या दहा सेकंदांत त्यांनी तो प्रश्न निकाली काढला,” असा किस्सा परेश रावल यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. नेमके काय म्हणाले परेश रावल? परेश रावल म्हणाले, मराठी असल्याने शरद पवार कलेची सेवा करतील, असे मला वाटायचे. मी शरद पवारांना मदतीसाठी विचारले. ते म्हणाले अरुण जेटलींचा वेळ घ्या. मी तुमच्यासोबत येतो. त्यानंतर मी अरुण जेटली यांच्याकडे वेळ मागितली. त्यादिवशी मी, निर्माते अजित भुरेकर आणि अशोक खांडेकर पवार साहेबांकडे सकाळी सात-साडेसातच्या सुमारास गेलो. त्यांना भेटलो चहा वगैरे घेतला. त्यांनी विचारले जेटलींनी किती वाजता बोलावले आहे. मी म्हणालो आठ वाजता बोलावले आहे. येथून फक्त 5 मिनीटे लांब आहे. पवार साहेब म्हणाले तिकडे जाऊन बसू…मात्र, तिथे गेल्यानंतर जेटलींना समजले की, शरद पवार आले आहेत. त्यामुळे ते लगेच आले. शरद पवार म्हणाले, थिअटरचा प्रश्न आहे. तेव्हा जेटली म्हणाले, हो मला परेशने सांगितले होते. ठीक आहे मी ते करतो. केवळ 10 सेकंदात नाटकांवरील जीएसटीचा प्रश्न सुटला. परेश रावल पुढे म्हणाले, मी शरद पवारांना म्हणालो तुम्ही 10 सेकंदात प्रश्न सोडवला. ही तर तुमची वोट बँक देखील नाही. तेव्हा परेश हा कला आणि संस्कृतीचा विषय असल्याचे शरद पवार मला म्हणाले. ही दादागिरी आहे. हे मराठी लोक आहेत. असा किस्सा परेश रावल यांनी सांगितला. संगीत देवबाभळी नाटकाचे केले कौतुक दरम्यान, या मुलाखतीत बोलताना परेश रावल यांनी मराठी नाटक ‘ संगीत देवबाभळी’चे भरभरून कौतुक केले आहे. आपण नशिबवान होतो की, मराठीत इतकी चांगली नाटके होतात. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळते. मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी दोन पावले पुढे आहे, कारण त्यांच्याकडे सशक्त, खूप उत्कृष्ट, पुढारलेले लेखकआहेत. जर कधी संधी मिळाली तर लेखक प्राजक्त देशमुख यांचे संगीत नाटक देवबाभळी, ते नक्की बघा, असा सल्ला परेश रावल यांनी दिला.