ड्रेसिंग रूममधल्या गोष्टी तिथेच राहू द्यायच्या:मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रोहित शर्माला टोला, नेमके प्रकरण काय?
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि या खास वर्धापनदिनानिमित्त एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबई क्रिकेटच्या इतिहासात या स्टेडियमचा महत्त्वपूर्ण वाटा असताना, आज या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वानखेडे स्टेडियममध्ये विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले. यावेळी क्रिकेटच्या दिग्गज खेळाडूंनी, जसे की सुनील गावस्कर, सचिन तेंडूलकर, रवी शास्त्री, कर्णधार रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी आपले अनुभव व्यक्त केले. याशिवाय, राजकीय क्षेत्रातील प्रमुख नेत्यांनाही उपस्थिती होती, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात सचिन तेंडूलकरने अप्रत्यक्षपणे कर्णधार रोहित शर्मा याला शाब्दिक टोला लगावल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी खेळवलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता, आणि त्यावेळी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये काही वाद झाले असल्याचे समोर आले होते. कर्णधार रोहित शर्मा याने या वादग्रस्त बाबी मीडिया समोर उघड केल्या होत्या. आजच्या कार्यक्रमात सचिनने वडापावचा एक किस्सा सांगताना रोहित शर्मा याला टोला दिला, आणि या शाब्दिक टोल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. सचिन तेंडुलकर म्हणाला, आमच्या ड्रेसिंग रुममधील एका खेळाडूची सवय होती, त्याला म्हटले की तू बॉलिंग करणार आहे. तर तो ड्रेसिंग रुममध्ये जाऊन बुट घालायचा. कधी बॅटिंगला जायला सांगितले तर डब्यातून काही खायचा. मात्र, ऐकेदिवशी आमच्या टीममधील दोन खोडकर मुलांनी ड्रेसिंग रुममध्ये गेले आणि त्याचा डब्बा खाल्ला. त्याच्या डब्यातील सगळे वडापाव खाल्ले. त्यानंतर तो प्लेअर पॅड घालण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये गेला, तेव्हा त्याला डब्बा मोकळा दिसला. मग तो रागात बाहेर आला. सर्वांना विचारू लागला माझा डब्बा कोणी खाल्ला? त्याने दंगा सुरु केला. प्रॅक्टिस थांबवा. डब्बा कोणी खाल्ला त्याचं पोट खराब होईल, असे म्हणाला. तो अर्धातास ओरडत होता. मात्र, नाव कोणीही सांगितले नाही. या गोष्टीला तीस वर्षे उलटले पण ते आम्ही सांगितले नाही. आम्ही भेटल्यावर त्यावर चर्चा होते. पण आजवर आम्ही ते कोणालाही सांगितलं नाही. ड्रेसिंग रुममधील गोष्टी ड्रेसिंग रुममध्येच ठेवले. मी आताही हे सांगणार नाही, असे म्हणत सचिनने रोहित शर्माला मिश्किल टोला लगावला आहे.