एकनाथ शिंदेंनी दिले मनपात महायुतीचे संकेत:तर ठाकरे गट, काँग्रेस, भाजपकडून स्वबळाचा नारा? इच्छुकांची धाकधूक वाढली

एकनाथ शिंदेंनी दिले मनपात महायुतीचे संकेत:तर ठाकरे गट, काँग्रेस, भाजपकडून स्वबळाचा नारा? इच्छुकांची धाकधूक वाढली

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या निवडणुका आगामी तीन ते चार महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती होण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि भाजपकडून स्वबळाचा नारा दिला जातोय. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांत महायुती आणि महाआघाडी होणार की, सर्व पक्ष स्वबळावर लढणार याबाबतचा निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे सर्वच महानगरपालिकेतील इच्छुक पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. या संदर्भात ठाणे येथील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे संकेत दिले आहेत. यावेळी ते म्हणाले की, विधानसभेला भाजप, शिंदेसेना, अजित पवार गटाने एकत्रित राहून यश मिळवले. मात्र, मुंबई मनपासह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा असल्याचे स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कशा लढल्या जातील, याविषयी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले की, काहीजण म्हणत होते की, सुप्रीम कोर्ट झाले आता जनतेच्या न्यायालयात जाऊ. पण, विधानसभा निवडणुकीत आपले 60 आमदार निवडुन आल्याने खरी शिवसेना कुणाची हे जनतेने ठरवले. काही जणांना स्वप्न पडले होते. त्यांनी मंत्रीमंडळही तयार केले होते. हॉटेलही बुक केले होते. पण, जनतेने आणि लाडक्या बहिणींनी त्यांचे बुकींग रद्द केले असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. महायुतीचा भगवा फडकवायचा – एकनाथ शिंदे लाडकी बहिण, भाऊ, शेतकरी, युवक, जेष्ठ अशा सर्वांनी भरभरून मतांचा वर्षाव केला आणि मी सांगत होतो, त्याप्रमाणे विरोधक चारही मुंड्या चीत झाले. आता विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, असे सांगत त्यांनी महायुतीचे संकेत दिले आहेत. संभाजीनगरमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. या संदर्भात भाजपच्या वतीने देखील जोरदार तयारी करण्यात आहे. सर्वच वॉर्डात इच्छुक नगरसेवक भाजप सदस्य नोंदणी अभियान राबवत आहेत. या माध्यमातून प्रचाराची एक फेरी पूर्ण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. संभाजीनगर महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. मात्र आता भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्ता हवी आहे. स्थानिक पदाधिकारी देखील तयारीला लागले आहेत. ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा महायुतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला एकत्रित सामोरे जाण्याचे संकेत मिळत असताना दुसरीकडे महाआघाडीतून मात्र स्वबळाचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांची स्वबळाची तयारी असेल तर काँग्रेस देखील स्वबळावर लढवण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी होईल का? याची फारच कमी शक्यता वर्तवली जात आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment