इंजिनिअरिंग कंपनीच्या मालकाला सायबर चोरट्यांचा गंडा:1 कोटी 90 लाखांची केली फसवणूक, पुण्यातील घटना

सायबर चोरट्यांनी पुण्यातील एका इंजिनिअरिंग कंपनीच्या मालकाला तब्बल 1 कोटी 90 लाख रुपयांचा गंडा घातल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. प्रस्तुत प्रकरणात भामट्यांनी 72 वर्षीय कंपनी मालकाचा फोटो आपल्या व्हॉट्सअॅप डीपीला ठेवन कंपनीच्या मॅनेजरला आपण कंपनीचे मालक असल्याचे भासवले. त्यानंतर त्याला बँक खात्यावर तत्काळ 1 कोटी 90 लाख रुपयांची पाठवण्यास भाग पाडले. या प्रकरणी व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अनाेळखी माेबाईल क्रमांकाचे धारक, वापरकर्ते व बँक खातेधारक यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 319 (2), 318 (4), सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार 6 ते 7 मार्च दरम्यान ऑनलाइन स्वरुपात घडला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनाेळखी माेबाईल धारकाने तक्रारदार यांच्या कंपनीतील अकाऊंट मॅनेजर यांना एका माेबाईल क्रमांकावरुन व्हाॅटसअॅप मेसेज केले. त्याच्या डीपीवर कंपनीच्या मालक यांचा फाेटाे ठेऊन तेच बाेलत असल्याचे भासवले. त्यानंतर त्यांनी नवीन प्राेजेक्टकरिता तात्काळ अॅक्सेस बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या माध्यमातून त्यांनी कंपनीची सुमारे 1 कोटी 90 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी पुढील तपास सायबर पाेलिस करत आहेत. मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरणारा गजाआड दुसरीकडे, मंदिरातील दानपेटीचे कुलूप फोडून चोरट्यांनी रोकट पळवल्याची घटना शनिवारी पेठेतील शिंदेपार चौकात घडली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोेलिसांनी चोरट्याला अटक केली. ओम बाळकृष्ण सातपुते (वय 38, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत राजेश भगवंत सागडे (वय 52, रा. शिंदेपार चौक, शनिवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेपार चौकात अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव मंडळाचे शनिमारुती मंदिर आहे. शनिमारुती मंदिरातील दानपेटीचे कुलूप सातपुतेने तोडले. दानपेटीतील 2100 रुपयांची रोकड चोरुन तो पसार झाला. कार्यकर्त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पाठलाग करुन सागडेला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.