फडणवीस मित्रत्व जपणारा माणूस:विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक; म्हणाले – अजित पवार, एकनाथ शिंदेंची उपयुक्तता संपल्यात जमा
एकनाथ शिंदे यांचा पक्ष वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री पदाशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे शिल्लक नाही. शिंदे आणि अजितदादांची उपयुक्तता आता संपल्यात जमा आहे, असा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. तर मुख्यमंत्रिपदानंतर उपमुख्यमंत्रिपद अन् मंत्रिपदावर काम करणारे अनेक जण आहेत. त्यात काही नवीन नाही. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदानंतर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलेच होते असेही त्यांनी म्हटलंय. दरम्यान विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या आशीर्वादानेच त्यांना सत्तेत राहता येईल, अन्यथा ते काहीही करू शकणार नाही. ते विरोधही करू शकणार नाहीत. सत्ता नाही दिली तरी गपचुप बसण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नाही, असा टोला त्यांनी शिंदे आणि अजितदादांना लगावला. सोबतच फडणवीस मित्रत्व जपणारा माणूस आहे, असे म्हणत त्यांचे तोंडभरून कौतुकही त्यांनी केले. विदर्भाच्या प्रश्नावर फडणवीस गंभीर विदर्भाच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, अनेकवेळा आम्ही विदर्भाच्या प्रश्नावेळी आमदार असताना सुद्धा लॉबीमध्ये बसून कोणत्या प्रश्नाला आपण पुढे नेले पाहिजे देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करायचो. आजही विदर्भाच्या प्रश्नासाठी न्याय मागायचा असेल तर आम्ही झुकतं माप दिलेलं आहे. सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेरही विदर्भाच्या प्रश्नाला घेऊन चर्चा होताना गंभीर देवेंद्र फडणवीसांना पाहिले आहे. सत्ता ही क्षितिजापलिकडेही विचार करायला लावते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ता ही क्षितिजापलिकडे विचार करायला लावते. जी क्षितिज नजरेला असते त्याच्या पलिकडेही विचार करणारी सत्ता असते. प्रत्येकजण पुढचे पाऊल गाठण्यासाठी धडपडत असतो. देवेंद्र फडणवीसांचा स्वभावच असा आहे की त्यांना पुढचे पाऊल गाठायचे असते. मित्र म्हणून आम्ही जवळ असू परंतू राजकीय विरोधक म्हणून फार काही आम्ही अपेक्षा ठेवत नाही. गेल्या 10 वर्षात ओबीसींना हवा तसा न्याय नाही विजय वडेट्टीवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची भिस्त ही ओबीसींच्या मतावर आहे. त्यामुळे ओबीसींचे प्रश्न आम्ही ज्या वेळेस मांडतो, आम्ही मंत्री असतानाही अनेक प्रश्न मांडले आणि सोडवण्याचा ही प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या दहा वर्षात ओबीसींना जितका न्याय मिळाला पाहीजे तितका अजूनही मिळालेला नाही. फडणवीसांचे केले कौतुक मित्र म्हणून तसेच राजकीय शत्रू म्हणून दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आहेत. राजकारणात ते काही गोष्टी सांगून करतात, तर काही गोष्टी न सांगता करतात. फडणवीस मित्रत्व जपणारा माणूस आहे. मात्र आले अंगावर तर घेतले शिंगावर असा त्यांचा स्वभाव आहे. असे असले तरी मित्र म्हणून त्यांच्या नवीन इनिंगला माझ्या शुभेच्छा, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.