चार दिवसांपूर्वी अजित पवारांचा मला फोन:दिलगिरीही केली व्यक्त, आपण बसून बोलू असे म्हटले; छगन भुजबळांची माहिती
![चार दिवसांपूर्वी अजित पवारांचा मला फोन:दिलगिरीही केली व्यक्त, आपण बसून बोलू असे म्हटले; छगन भुजबळांची माहिती](https://images.bhaskarassets.com/thumb/1000x1000/web2images/5483/2025/02/06/new-project-2025-02-06t163622495_1738840093.jpg)
राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज होते. त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे त्यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला होता. आता अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वी मला फोन केल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. उशिरा फोन केल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज झाले होते. जहाँ नहीं चैंना वहाँ नहीं रहना म्हणत त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी वेगळे होण्याचेही संकेत दिले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच आता अजित पवारांनी फोन केल्याची माहिती समोर आल्याने छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्रिपदावरून नाराजी दूर झाल्याबद्दल भाष्य केले. विशेष म्हणजे छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन केल्याचे त्यांनी सांगितले. शिर्डीच्या अधिवेशनासाठी मला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी येण्याची विनंती केली होती. तेव्हा मी शिर्डीला गेलो होतो. मला चार दिवसांपूर्वी अजित पवारांचा फोन आला होता. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली की, त्यांनी उशिरा फोन केला म्हणून. त्यांनी आपण बसून बोलू असे म्हटले आहे, अशी माहिती छगन भुजबळांनी दिली. नाराजी कमी झाली की जास्त यासाठी थर्मामीटर लावून पाहिले पाहिजे
छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमागचे कारणही सांगितले. कोणी म्हणतो नाराजी कमी झाली तर का कोणी म्हणतो नाराजी वाढली, त्याचे थर्मामीटर लावून पाहिले पाहिजे, म्हणजे नाराजी कमी झाली की जास्त झाली हे समजेल, असे मिश्कील वक्तव्य त्यांनी यावेळी केले. अजित पवार यांच्याकडून तुमची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत का? असे विचारले असता मला त्याबाबत काहीही विचारू नका, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. शिवभोजन थाळी सुरू ठेवण्याची केली विनंती
छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, नाशिकला सिंहस्थ कुंभ येत आहे. त्यामुळे नाशिकला आर्थिक निधी मिळाला पाहिजे. त्याचबरोबर कांद्यावरील निर्यात मूल्य काढून टाकल पाहिजे त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचे छगन भुजबळ म्हणाले. शिवभोजन थाळीचा लाभ हा 2 हजार केंद्रात होत आहे आणि लाखो लोक हे याचा फायदा घेत आहेत. त्यामुळे ही योजना बंद झाली नाही पाहिजे. याकरिता ही भेट मी घेतली होती, असेही त्यांनी सांगितले. शिवभोजन थाळी केंद्रावरील खर्च हा कमी आहे. राज्यात अनेक हजारो कोटींचे प्रकल्प होत आहे. त्यामुळे गरीब लोकांना या केंद्रांचा फायदा होत आहे. त्यामुळे ही योजना चालू ठेवली पाहिजे, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केल्याच छगन भुजबळांनी सांगितले.