संसदेत गदारोळ:काँग्रेसने दिल्या जय भीमच्या घोषणा; भाजपने म्हटले- त्यांचा अपमानाचा इतिहास, आज नाटक करत आहेत

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज, बुधवारी १८ वा दिवस आहे. आंबेडकरांच्या अपमानावरून लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात जय भीमच्या घोषणा दिल्या. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेस आणि इतर विरोधी खासदारांनी केला आहे. एक दिवस आधी मंगळवारी गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत संविधानावर चर्चा केली होती. यावेळी ते म्हणाले होते की, त्यांनी (काँग्रेस) आंबेडकरांच्या नावाएवढे देवाचे नाव घेतले असते तर त्यांना स्वर्गात स्थान मिळाले असते. गृहमंत्र्यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस खासदारांनी संसदेच्या गेटवर निदर्शने केली. दुसरीकडे केंद्रीय मंत्री अर्जन राम मेघवाल यांनी लोकसभेत सांगितले की, काँग्रेसचा अपमानाचा इतिहास आहे, आज ते ढोंग करत आहेत.

Share