गृहपाठ न केल्याने चौथीच्या विद्यार्थिनीला अमानुष शिक्षा:मुलींना चालनेही झाले कठीण, शिक्षिकेवर कठोर कारवाईची संतप्त पालकांची मागणी

गृहपाठ न केल्याने चौथीच्या विद्यार्थिनीला अमानुष शिक्षा:मुलींना चालनेही झाले कठीण, शिक्षिकेवर कठोर कारवाईची संतप्त पालकांची मागणी

पालघर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना शिक्षिकेने अशी शिक्षा केली, ज्यामुळे चार दिवसापासून विद्यार्थिनी त्रस्त झाली आहे. जवळपास शंभराहून अधिक उठाबशा या विद्यार्थिनीला काढाव्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. वसई येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या भाताणे-बेलवाडी इथल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत चौथीत शिकणाऱ्य विद्यार्थिनीने गृहपाठ केला नव्हता. त्यामुळे शिक्षिकेने तिला मी वर्गात बोलवत नाही तोपर्यंत उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. यात विद्यार्थिनीला शंभर पेक्षा जास्त उठाबशा काढाव्या लागल्या असल्याची माहिती विद्यार्थिनीने दिली आहे. या शिक्षेमुळे तीन ते चार विद्यार्थिनींचे पाय सुजले असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. तसेच चालण्यासही त्यांना त्रास होत असल्याचे समजते. 2 एप्रिल रोजी ही घटना घडली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनी शाळेत आल्यावर त्यांना होणारा त्रास शिक्षकांच्या लक्षात आला व त्यांनी दवाखान्यात या विद्यार्थिनींना नेले. दवाखान्यात उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी या विद्यार्थिनींना बघून अधिकची चौकशी केली असता त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी मुलींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून या प्रकारची माहिती दिली. पालकांनी शिक्षकांना संपर्क केला असता त्यांना नीट उत्तरे देण्यात आली नाहीत. शनिवारी पालकांनी थेट शाळा गाठली व मुलींची चौकशी केली. इतरही अनेक मुलींचे पाय सुजले असल्याचे समोर आले. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलींना घरी आणले असून त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. मुलींना चालताही येत नसल्याने पालकांनी काळजी व्यक्त केली आहे. तसेच अमानुष शिक्षा करणाऱ्या शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त पालकांनी केली आहे. दरम्यान, वसई तालुक्यातील बेलवडी आश्रमशाळेतील या प्रकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना एका मुलीच्या पालकांनी सांगितले की, आम्ही वीटभट्टीवर काम करून आमचा उदरनिर्वाह करतो. आम्हाला शिक्षण घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे आमच्या मुलीला शिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही मुलीला शासकीय यंत्रणेच्या भरवशावर शाळेत ठेवले. मात्र शिक्षिकेकडून आमच्या मुलीला अमानुष शिक्षा देण्यात आली. या शिक्षिकेवर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment