गुजरात, कर्नाटकात आठ वर्षांच्या दोन विद्यार्थिनींचा शाळेतच हार्टअटॅकने मृत्यू:24 तासांतील दोन दुर्घटना, रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका ८ वर्षीय मुलीचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शाळेत असताना या विद्यार्थिनीच्या छातीत तीव्र वेदना झाल्या. त्यामुळे शिक्षकांनी तातडीने रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत तिची प्राणज्याेत मालवली होती. गुरुवारी कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातही अशीच धक्कादायक घटना घडली होती. अहमदाबादमधील एका खासगी शाळेत शिकणारी गार्गी रानपारा ही मुलगी शुक्रवारी सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे शाळेत पोहोचली होती. पायऱ्या चढत असताना अचानक तिच्या छातीत दुखू लागले. वेदना झाल्यामुळे ती लॉबीतील बेंचवर बसली आणि काही सेकंदांत जमिनीवर पडली. मुख्याध्यापिका शर्मिष्ठा सिन्हा यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांनी १०८ रुग्णवाहिका बोलावली, परंतु रुग्णवाहिका शाळेत पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे गार्गीला कर्मचाऱ्यांच्या गाडीतून नेले. मात्र रुग्णालयात जाईपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण सांगितले. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. आई-वडील मुंबईत, गार्गी राहायची आजीकडे गार्गीचे आई-वडील मुंबईत राहतात. ती आजी-आजोबांसोबत राहत होती. तिला कुठलाही आजार नव्हता, असे कुटुंबीयांनी व शिक्षकांनी सांगितले. घटनेनंतर पोलिसांनी शाळेत जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुन्हे शाखेच्या पथकाने शाळेचीही चौकशी केली आहे. मात्र शंकास्पद कुठलीही घटना आढळून आली नाही. शिक्षिकेला वही दाखवायला जाताना तिसरी वर्गातील तेजस्विनी काेसळली कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात गुरुवारी असाच एक प्रकार घडला. येथील सेंट फ्रान्सिस शाळेतील ८ वर्षांची तेजस्विनी वर्गात शिक्षकांना वही दाखवण्यासाठी बेंचवरून उठली, मात्र जागेवरच बेशुद्ध झाली. तेजस्विनीने भिंतीचाही आधार घेतला, मात्र ती जमिनीवर कोसळली. शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिच्या मृत्यूचेही प्राथमिक कारण हृदयविकाराचा झटकाच असल्याच डॉक्टरांनी सांगितले.