हिंगोलीत उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर पालिकेचे धडक कारवाई:10 दुकानदारांना नोटीस, 15 पेक्षा अधिक दुकानांचे रस्त्यावरील साहित्य जप्त

हिंगोली शहरात उघड्यावरील मांस विक्रीच्या दुकानांवर पालिका प्रशासनाने रविवारी ता. 27 धडक कारवाई सुरु केली असून यावेळी 10 दुकानदारांना नोटीस दिल्या आहेत तर 15 दुकानांचे रस्त्यावरील साहित्य जप्त केले आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. हिंगोली शहरात पेन्शनपुरा यासह इतर भागात उघड्यावर मांस विक्री केली जात होती. मांस विक्रेत्यांनी दुकानांच्या समोरच ठाण मांडून त्या ठिकाणावरून विक्री सुरु केली होती. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरीकांना मोठा त्रास होत होता. विशेष म्हणजे मांस विक्रीच्या दुकानांच्या भागात दुर्गंधी सुटल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले होते. दरम्यान, या संदर्भात नागरीकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पालिकेने मांस विक्रेत्यांना सुचनाही केल्या होत्या. मात्र विक्रेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष चालविले होते. या प्रकारानंतर आज पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे, अभियंता प्रतिक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पथकाने आज सकाळीच धडक कारवाईची मोहिम हाती घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जमादार अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर, संतोष करे यांचे पथकही बंदोबस्तासाठी होते. यामध्ये पालिकेच्या पथकाने उघड्यावरील मांस विक्री करणाऱ्या 10 दुकानातील मांस जप्त करून नष्ट केले. तसेच या दुकानदारांना नोटीस देखील दिल्या. या शिवाय सुमारे 15 दुकानदारांकडून रस्त्यावर गाडे व इतर साहित्य ठेऊन मांस विक्री केली जात असल्याने त्यांचे गाडे व साहित्य जप्त केले आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे उघड्यावरील मांस विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत