विनोद कांबळीला पाहताच सचिन तेंडुलकर धावतच जाऊन भेटला:प्रसंगाने वेधले सर्वांचेच लक्ष, रमाकांत आचरेकरांच्या स्मारकाचे लोकार्पण
क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मारकाचे अनावरण मुंबई येथील शिवाजी पार्क परिसरात करण्यात आले. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सचिन तेंडुलकर, बलविंदरसिंग सिंधू, संजय बांगर, विनोद कांबळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी एक प्रसंग घडला ज्याने सर्वांचेच लक्ष वेधले. या कार्यक्रमाच्या वेळी सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे गप्पा मारत स्टेजवरच उभे होते. तेवढ्यात मंचावरच बसलेले विनोद कांबळी सचिन तेंडुलकर यांना दिसतात आणि राज ठाकरे यांच्यासोबत सुरू असलेली चर्चा थांबवत विनोद कांबळी यांच्याकडे भेटायला जातात. सचिन तेंडुलकर भेटायला आल्याने विनोद कांबळी देखील आनंदी होतात आणि गळाभेट करतात. या प्रसंगाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी राज ठाकरे यांनी भाषण देखील केले. राज ठाकरे म्हणाले, मी दरवर्षी बघायचो आमच्या तिथेच आचरेकर सर राहायचे. दरवर्षी गुरुपौर्णिमेला सचिन तेंडुलकर न चुकता यायचे. आता आपल्याकडे गुरुपौर्णिमा ही मोबाईलवर राहिली आहे. हॅप्पी गुरुपौर्णिमा! हे हॅप्पी गुरुपौर्णिमा काय असतं हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. अजून एक मेसेज असतो, ज्या ज्या लोकांनी माझ्या आयुष्यासाठी जे केले आहे.. अरे त्यात मी आहे की नाही, मला का पाठवलं आहे? कल्पनाच नसते आम्हाला, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे म्हणाले, आचरेकर सरांचं योगदान इतकं मोठं आहे की त्यांचं इथं स्मारक व्हावं, असं मला पहिल्यापासून मनापासून वाटत होतं. आमचे सुनील रमणी यांच्याशी मी बोललो आणि त्यांना मी सांगितलं की असं असं आपण एक स्मारक बनवूया. पण मला इथे आचरेकर सरांचा पुतळा नको होता, कारण पुतळे खूप झाले आहेत आपल्याकडे. मी म्हणलं काही तरी वेगळं करूया, ज्यातून आचरेकर सरांची ओळख, योगदान या सगळ्या मुलांना पण कळेल येणाऱ्या. आचरेकर सरांनी जे संस्कार केले आहेत या खेळाडूंवरती ते यांच्याकडे बघून दिसतं आपल्याला.