इंदूमील येथील स्मारकासाठी शरद पवारांचा पाठपुरावा:सुप्रिया सुळेयांचा दावा; अपेक्षीत काम न झाले हे दुर्देव म्हणत, महायुती सरकारवर टीका

इंदूमील परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक संदर्भात शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता. मात्र, आता तीन वर्षे झाले तरी देखील अपेक्षित काम झालेले नाही हे दुर्दैव असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. हे काम तातडीने आणि चांगल्या दर्जाचे होण्याची अपेक्षा आहे. अशा कामांमध्ये जी प्रगती अपेक्षित होती, ती प्रगती झालेली नसल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सुप्रिया सुळे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. चैत्यभूमी, दादर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ही छायाचित्रे पाहताना त्यांचा जीवनप्रवास आपल्यापुढे उलगडत जातो. एका महामानवाची जडणघडण कशी झाली हे समजून येण्यासाठी ही छायाचित्रे अतिशय महत्त्वाची असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. या सर्व छायाचित्रांची पाहणी सुळे यांनी या वेळी केली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी, दादर येथे जाऊन सुळे यांनी आंबेडकर यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. या वेळी सुळे म्हणाल्या की, ‘त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गानेच देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकते.त्यांचे विचार आगामी पिढ्यांना सदैव मार्गदर्शन करीत राहतील. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन.’