न्यायालयाचा निर्णय करुणा मुंडेंच्या बाजूने:धनंजय मुंडे मंत्रीपदावर राहणे योग्य नाही – विजय वडेट्टीवार; अजून कोण काय म्हणाले?

करुणा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप करत कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतील आरोप न्यायालयाने मान्य केले आहे. तसेच करुणा मुंडे यांना दरमहा सव्वा लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. या प्रकरणावर मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. करुणा शर्मा कुणाची तरी बहीण लेक आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणाले. तर धनंजय मुंडे मंत्रीपदावर राहणे योग्य नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. याशिवाय ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, तृप्ती देसाई, अंजली दमानिया यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. करुणा शर्मा-मुंडे यांनी धनंजय मुंडेंविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे करुणा शर्मा-मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराड अटक झाल्यानंतर आता याप्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करुणा मुंडेंनी दिलेला लढा कौतुकास्पद – अंधारे
करुणा मुंडेंबद्दल कोर्टाने दिलेला निर्णय हे अभिनंदनीय आहे. एका महिलेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे. त्यांनी दिलेला लढा कौतुकास्पद आहे. फडणवीस यांना सगळे माहिती असताना तरी देखील कानावर हात ठेवून का आहेत? हा कळीचा मुद्दा आहे, असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. तो व्यक्त मंत्रीपदावर राहणे योग्य नाही – वडेट्टीवार
त्या निर्णयाचे स्वागत करतो. प्रतिष्ठित व्यक्तीने आणि संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने अस वागणे योग्य नाही. त्या महिलेची भूमिका न्यायालयाने मान्य केली. याचा अर्थ विद्यमान मंत्र्यांनी कौटुंबिक हिंसा केली. जर दोन लाख पोटगी द्या म्हणते म्हणजे कौटुंबिक हिंसा झाल्याचे कोर्टाने मान्य केले आहे. तो व्यक्ती मंत्री पदावर राहणे योग्य नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. धनंजय मुंडेचा पापाचा घडा भरला – तृप्ती देसाई
आतापर्यंत धनंजय मुंडेंनी राजकीय दबावापोटी आणि पदाचा गैरवापर करत अनेक कृत्य केली आहेत. मला वाटते आता पापाचा घडा भरत आला आहे. खरे तर करुणा शर्मांना न्याय मिळाला असे म्हणावे लागेल. मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. माझ्यावर घरगुती हिंसाचार झाला आहे. मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. मला खर्च दिला जात नाही, असे करुणा शर्मा वारंवार सांगत होत्या. कोणतीही दखल घेतली नसल्याने त्या न्यायालयात गेल्या. कोर्टाने आज त्यांना न्याय दिला. एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन – अंजली दमानिया
या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील एका पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, ‘करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात 4 फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. करुणा, ह्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि 1,25,000 रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.’

  

Share