खडकाळ माळरानावर शिक्षक दाम्पत्याने फुलवली फळ झाडे:गाडेकर दाम्पत्याच्या कर्तृत्वामुळे संगमनेर तालुक्यातील लहुचामळा जि. प. शाळेचे रूप पालटले

इच्छाशक्ती आणि कष्ट यांच्या जोरावर कोणतेही कार्य अशक्य नाही, हे सिद्ध केले आहे लहुचामळा ( संगमनेर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक रोहिदास गाडेकर आणि त्यांच्या पत्नी आशा गाडेकर यांनी. खडकाळ माळरानावर झाडे लावून त्यांचे संवर्धन करत त्यांनी शाळेच्या परिसराला नंदनवनाचा साज चढवला आहे. त्यांच्या या कर्तृत्वामुळे संपूर्ण शाळेचे रूप पालटले आहे. ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. संगमनेर तालुक्यातील नांदूर-खंदरमाळ परिसरात चारही बाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेले लहुचामळा गाव आहे. येथे पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. मात्र, ही शाळा खडकाळ माळरानावर वसलेली असल्यामुळे येथे वृक्षारोपण आणि शेती अशक्यप्राय होते. परंतु मुख्याध्यापक रोहिदास गाडेकर आणि शिक्षिका आशा गाडेकर यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेत सातत्याने प्रयत्न केले आणि खडकाळ माळरानालाही पाझर फोडला. शाळेच्या पाठीमागील माळरानावर आंबा, वड, पिंपळ, अंजीर, उंबर, चिंच, पेरू, लिंब, शेवगा, केळी अशी अनेक झाडे लावली गेली. या झाडांना नित्यनेमाने पाणी देऊन आणि योग्य देखभाल करून सात-आठ फूट उंच वाढवण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे, शिक्षक रोहिदास गाडेकर सुट्टीच्या दिवशीही शाळेत येऊन झाडांना पाणी घालतात आणि त्यांचे संवर्धन करतात. संपूर्ण जिल्ह्यात एकमेव परसबाग लहुचामळा शाळेत आहे. “ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही हे स्वप्न साकार करू शकलो, असे शिक्षक दाम्पत्याने सांगितले. या कार्यात गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड, शालेय पोषण आहार अधिक्षक दीपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख बाळासाहेब घुले, तसेच ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांचे सातत्याने सहकार्य मिळाले. माळरानावर हिरवाई मी चार वेळा शाळेला भेट दिली. गाडेकर दाम्पत्याने खूप मेहनतीने परसबाग फुलवली आणि खडकाळ माळरानावर हिरवाई निर्माण केली आहे. त्यांचा जनसंपर्कही उत्कृष्ट आहे. कामाशी काम करणारे हे शिक्षक आहेत. त्यांचे कार्य संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे, असे संगमनेरचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड यांनी सांगितले.