खुलताबादच्या नामांतरावर संजय शिरसाट ठाम:म्हणाले – नामांतर नाही, आधीची चूक दुरुस्त करणार; मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र

खुलताबादच्या नामांतरावर संजय शिरसाट ठाम:म्हणाले – नामांतर नाही, आधीची चूक दुरुस्त करणार; मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र

राज्यात औरंगजेबाच्या कबरीवर सुरू झालेला वाद थांबत नाही, तोच आता खुलताबाद शहराचे नामांतर करण्याची मागणी होत आहे. खुलताबादचे नामकरण रत्नपूर करण्यावर आपण ठाम असल्याचे शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. खुलताबादचे पूर्वीचे नाव रत्नपूरच होते. शासकीय रेकॉर्डवर तशी नोंद असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. मुस्लिम शासकांनी बदललेले नाव पुन्हा दुरुस्त करायचे आहे. त्यासाठी मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असून पत्र देणार असल्याचेही ते म्हणाले. छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारणाऱ्या औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी महिनाभरापूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. यासाठी रस्त्यांवर आंदोलनही करण्यात आली. याचदरम्यान या मुद्द्यावरून नागपूरमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. हा वाद शांत होत नाही, तोच आता औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबाद शहराचे नामांतर करण्याची मागणी समोर आली आहे. भाजपचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार संजय केनेकर यांनी याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे मागणी केली आहे. या मागणीचा आधार घेत संजय शिरसाट यांनी खुलताबादचे नामकरण करणार असल्याचे म्हटले आहे. नेमके काय म्हणाले संजय शिरसाट? खुलताबादचे नाव याआधी सुद्धा रत्नपूर होते हे रेकॉर्ड वर आहे. इंग्रजांच्या काळापासून नाव रेकॉर्डवर रत्नपूरचा आहे. दौलताबादचे नाव दौलताबाद नाही देवगिरी आहे. त्याला देवगिरी प्रांत म्हटले जायचे. हे नामांतर नाही झालेली चूक दुरुस्त करायची आहे. औरंगजेबाची कबर खोदायचा विषय जेव्हा काढला तेव्हा काही जणांचा त्याचा त्रास झाला. त्यांना त्याचा स्वाभिमान आहे. आम्हाला आमचा स्वाभिमान जागृत करायला नको का? असा सवालही शिरसाटांनी केला. पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, आम्ही नवीन काही मागत नाही आहे. मी मुख्यमंत्र्यांना या सगळ्या संदर्भात पत्र देत आहे आणि तांत्रिकदृष्ट्या विधिमंडळात दोन्ही सभागृहात याला मंजुरी घ्यावी लागेल. मग केंद्राच्या मान्यतेनुसार हे नाव बदलले जाईल. उबाठा शेवटच्या घटका मोजत आहे दरम्यान, देवदर्शनाच्या सगळ्या जमिंनी आपल्या मित्रांना, उद्योगपतींना देणार असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे. यावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. कुठल्याही जागेवर सरकारचा डोळा नाही, असे शिरसाट म्हणाले. या जमिनी अदानी अंबानीला देतील असे कधी होईल का? हजार एकर असलेली ही जागा आहे. सहजासहजी कोणाच्या घशात या जागा टाकता येत नाहीत. कॅथलिक चर्चच्या जागा आम्हाला कशाला हव्यात? या जागा सगळे अधिकृतपणे दिसतील. मुस्लिम ख्रिश्चन समाजाची मत आपल्याकडे कशी येतील, हा प्रयत्न या माध्यमातून होतोय. या समाजाला माहिती आहे सरकारने घेतलेली भूमिका योग्य आहे. उबाठा किती बोंबलले तरी काही होणार नाही. उबाठा एकटी पडली आहे. इंडिया आघाडी संपली आहे. उबाठा शेवटच्या घटका मोजत आहे. असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment