लालूदेखील म्हणाले, इंडिया आघाडीचे नेतृत्व ममतांकडे द्या:आघाडीच्या मजबुतीसाठी विचार व्हावा- संजय राऊत
महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीत अस्वस्थता असल्याच्या बातम्या येत आहेत. आघाडीचे नेतेच काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ६ डिसेंबर रोजी सांगितले होते की, संधी मिळाल्यास मी इंडिया आघाडीचे नेतृत्व यशस्वीपणे सांभाळू शकते. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते, ममतांमध्ये आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आता राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनीही याला सहमती दर्शवली आहे. काँग्रेसने याप्रकरणी आक्षेप घेतल्यास काहीही होणार नाही, असेही ते म्हणाले. शिवसेनेनेही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या विषयावर चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर कुणीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. ते आपल्या सर्वांचे नेते आहेत. मात्र, कुणाला नवा मुद्दा मांडायचा असेल आणि आघाडी मजबूत करायची असेल, तर त्याचा विचार व्हायला हवा. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.