मागील वर्षी दावोसमधील करारांचे काय झाले?:जयंत पाटील यांचा सवाल; गुंतवणूक कागदावरच न राहता प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा
महाराष्ट्र मध्ये गुंतवणूक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे. मात्र, मागील वर्षी अशाच प्रकारच्या बातम्या येत होत्या. त्या कराराचे पुढे काय झाले? प्रत्यक्षात किती गुंतवणूक आली? असा प्रश्न शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. या माध्यमातून राज्य सरकारच्या वतीने दावोस मध्ये पंधरा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करार करण्यात आले असल्याचा दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ही गुंतवणूक फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात यावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावेस दौऱ्यावर असून या दरम्यान त्यांनी अनेक कंपन्यांसोबत महाराष्ट्र शासनाचे सामंजस्य करार केले आहेत. यामाध्यमातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जात आहे. या वर्षी प्रमाणे गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्या करारांचे पुढे काय झाले? हे राज्यकर्त्यांनाच ठाऊक असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. यंदाही गुंतवणुकीची मोठी यादी सरकारने मांडली आहे. मात्र ती गुंतवणूक कागदावरच न राहता प्रत्यक्षात यावी आणि रोजगार मिळावा, अशा शुभेच्छा त्यांनी सरकारला दिल्या आहेत. जयंत पाटील यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. मोठी बातमी! दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ५ लाख कोटींची गुंतवणूक, दुसऱ्या दिवसापर्यंत १५.७० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी एकूण ५४ समंजस करार. दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून अशा बातम्या रोज येत आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे. पण ही फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले! कारण मागील वर्षीही अशाच प्रकारच्या बातम्या येत होत्या.
उदा. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटींचा करार.
जिंदाल यांच्यासमवेत ४१ हजार कोटींचा करार
हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी ५६ हजार कोटींचा करारा
या करारांचं पुढे काय झाले, प्रत्यक्षात किती गुंतवणूक आली हे राज्यकर्त्यांनांच ठाऊक.
यंदाही गुंतवणुकीची मोठी यादी सरकारने मांडली आहे. मोठ्या मोठ्या वल्गना केल्याचे दिसून येत आहे. या गुंतवणुकी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात याव्यात, लोकांना रोजगार मिळावा व महाराष्ट्राची भरभराट व्हावी ह्याच शुभेच्छा! जागतिक आर्थिक परिषदेत 15 लाख 70 कोटींची गुंतवणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत. याठिकाणी ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी सहभागी झाले आहेत. राज्य सरकारने जागतिक आर्थिक परिषदेत आतापर्यंत 61 सामंजस्य करारांवर सह्या केल्या असून यातून 15 लाख 70 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दावोसमध्ये महाराष्ट्राची शक्ती काय आहे? ती मांडण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या देशातील प्रतिनिधींसोबत संवाद साधला. या ठिकाणी 6 राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्री होते. भारत म्हणून आम्हाला आमची भूमिका मांडता आली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दावोसमध्ये वेगवेगळ्या टेक्नोलॉजी शिकायला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले आहे.