मराठी भाषेवरुन ‘मनसे’आक्रमक होताच ‘ठाकरे गट’ही सरसावला:मराठी शिकवण्याची दर्शवली तयारी; मुंबई मनपा निवडणुकीवर लक्ष?

मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अमराठी लोकांना मारहाण करत आहेत. तुम्हाला मराठी येत नसेल आणि ती शिकायची असेल तर आम्ही तुम्हाला शिकवू. अशा प्रकारची घोषणा ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी केली आहे. या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आव्हान दिले आहे. सध्या राज्यात मराठी विरुद्ध अमराठी वाद वाढत आहे. मराठीच्या सक्ती-साठी राज ठाकरे यांचा पक्ष आक्रमक झाला आहे. त्यात आता मनसेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील साथ मिळत आहे. त्यातच मराठी माणूस आणि मराठी भाषेचा मुद्दा हातातून सुटू नये म्हणून आता ठाकरे गटानेही ही नवीन घोषणा केली असल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात होणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. ही घोषणा करणारे आनंद दुबे कोण आहेत? आनंद कुमार रवींद्रनाथ दुबे यांचा जन्म 4 जानेवारी 1981 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला. ते सध्या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम करत आहेत. ते चार वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब कांदिवली, मुंबई येथे स्थलांतरित झाले होते. त्यांनी त्यांचे शिक्षण मुंबईतील एन.एल. हायस्कूल आणि ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मधून पूर्ण केले आहे. आनंद कुमार रवींद्रनाथ दुबे हे एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम करत आहेत. दुबे यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसपासून केली, जिथे त्यांनी सदस्य आणि प्रवक्ते म्हणून काम केले. त्यांच्या राजकीय सक्रियता आणि वक्तृत्वाचा फायदा घेत, दुबे यांनी शिवसेनेत (UBT) प्रवेश केला आणि राष्ट्रीय प्रवक्त्याची भूमिका पार पाडली. प्रवक्ते म्हणून, दुबे यांनी विविध मुद्द्यांवर आवाज उठवला आहे. विधानसभा निकालानंतरही केला होता मोठा दावा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर चिंतनाची प्रक्रिया सुरू होती, त्यावेळी ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी सांगितले होते की, आम्ही चूक कुठे झाली? हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. जिथे काही चूक झाली असेल तिथे ती सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, आम्ही एकटे लढलो असतो किंवा मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव आधीच पुढे केले असते, तर निवडणुकीत नक्कीच चांगले निकाल मिळाले असते. ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आधीच पुढे केले असते तर विधानसभा निवडणुकीत या परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते, असा दावा देखील त्यांनी केला आहे.