सामूहिक गदापूजन:जिल्ह्यात हनुमंतरायांचा गजर, “जय हनुमान ग्यान गुणसागर”चा मंत्रजाप

हनुमान जयंतीनिमित्त शनिवारी १२ एप्रिल रोजी शहरासह जिल्हाभरातील हनुमानरायांचा गजर होता. रामराज्याच्या स्थापनेसाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या श्री हनुमान जयंतीनिमित्त कोंडेश्वर रोड स्थित बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिरासह पाच ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रमही घेण्यात आला. श्री लकडोबा हनुमान मंदिर-हनुमान नगर, श्री हनुमान मंदिर-विजय नगर, श्री मारुती संस्थान-वाकी रायपूर आणि श्री हनुमान मंदिर चांगापूर येथे गदापूजन करून पवनपुत्र हनुमानजींचा जयघोष करण्यात आला. अयोध्येत श्रीराममंदिर स्थापन झाल्यामुळे आता एकप्रकारे रामराज्याची सुरुवात झाली असून हिंदू समाजातील शौर्य जागृत होण्यासाठी आज भक्तीभावाने हनुमान जयंती साजरी करण्यात आली, अशा अनेकांच्या प्रतिक्रिया होत्या. हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह भाविकांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गदापूजनाच्या कार्यक्रमांची सुरुवात शंखनादाने झाली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुती स्तोत्रपठण केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिर येथे गदा पूजन परमपूज्य संत श्री बंडोजी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम गावंडे, दादारावजी धोटे, दिनेश सोनोने, दिलीपराव निंभोरकर, हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक निलेश टवलारे, अविनाश बोडखे आदी उपस्थित होते. ‘गदापूजना’मागील भूमिका स्पष्ट करताना टवलारे म्हणाले, मारुतीरायांची ‘गदा’ हे केवळ युद्धातील अस्त्र नव्हे, तर ती धर्मरक्षणाचा संकल्प, अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि भगवंताच्या कार्यासाठी अहर्निश झटण्याचे प्रतीक आहे. आज अयोध्येत श्रीरामलल्ला विराजमान झाले आहेत. पण श्रीरामाचे कार्य अजून अपूर्ण आहे. हे कार्य हनुमानासारखे शौर्य, निष्ठा, त्याग आणि सामर्थ्य यांच्याशिवाय शक्य नाही. तसा निर्धार सर्वांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले. हनुमान जयंतीनिमित्त जिल्ह्यातील प्रसिद्ध जहागीरपूर, संकट मोचन हनुमान मंदिर-रवी नगर, चांगापूर तसेच लहान मोठ्या हनुमान आणि श्री संत गजानन महाराज मंदिरांमध्ये पहाटे चार वाजेपासूनच हनुमान जन्मोत्सवाची तयारी सुरू होती. अभिषेक, महा लघु रुद्र अभिषेक, शेंदूर उटी लेपन, श्री हनुमंताच्या मूर्तीचा शृंगार, श्री हनुमंताला प्रिय असलेल्या रुईच्या फुलांचे तसेच इतरही फुलांचे हार अर्पण करण्यात आले. सहा वाजताची जन्मवेळ लक्षात घेता श्री हनुमान जयंतीची आरती सुरू झाली. महाआरती आटोपल्यानंतर काही मंदिरांमध्ये हनुमंताचा पाळणा करण्यात आला. त्यानंतर एकमेकांना गुलाल लावून हनुमान जयंतीचा आनंद साजरा करण्यात आला. श्री हनुमंताला नारळ, बुंदीचे लाडू, चणे याचा प्रसाद अर्पण करण्यात आला. त्यानंतर बहुतेक मंदिरांमध्ये काल्याचे वितरण झाले. अनेकांनी गुळ खोबऱ्याचा प्रसादही अर्पण केला.