सैन्यदलात भरतीसाठी तरुणांना मिळाले नवे व्यासपीठ:पुण्यात ‘युगांतर 2047’ उपक्रमात तीन हजार एनसीसी विद्यार्थ्यांचा सहभाग

सैन्यदलात भरतीसाठी तरुणांना मिळाले नवे व्यासपीठ:पुण्यात ‘युगांतर 2047’ उपक्रमात तीन हजार एनसीसी विद्यार्थ्यांचा सहभाग

भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ’युगांतर 2047’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांमधील तीन हजार एनसीसी विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेत भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रनिर्माणासाठी पुढाकार घेत या प्रेरणादायी सेमिनारचे आयोजन केले होते. युवक, योग आणि तंत्रज्ञान हे भारताच्या प्रगतीचे आधारस्तंभ असलेल्या या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये सखोल चर्चा झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नवी दिल्ली येथील सैन्यभरती महासंचालक लेफ्टनंट जनरल अनूप शिंगल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मे. जन. योगेश चौंधरी, एडीजी, झेआरओ पुणे, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, आरएमडी फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल- बालन, निवृत्त ब्रिगेडीयर सैरभसिंह शेखावत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर बोलताना लेफ्टनंट जनरल शिंगल यांनी भारतीय सैन्याच्या राष्ट्रनिर्माणातील महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला आणि युवकांनी सैन्यात भरती होऊन देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. भारतीय लष्कर ही केवळ नोकरी नाही तर ती आपली जीवनशैली आहे, ती संकटाशी सामना करण्याची ताकद देते, जी लष्करातील प्रमुख सेनानींना घडवते, तसेच लष्करातील इतर कर्मचार्‍यांना शीस्त लावते. भारताचे भविष्य हे नव्या ऊर्जेने तरुणांचा हातात येत आहे. त्यासाठी युगांतर सारखे कार्यक्रम महत्वाचे आहेत. या सेमिनारमध्ये अनेक उपक्रम झाले त्यात वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांकडून प्रेरणादायी व्याख्याने, करिअर मार्गदर्शन सत्र, भारतीय सैन्यातील संधींबाबत माहिती, एनडीए कॅडेट्सचे अनुभव, विशेष प्रेरणादायी भाषण ज्यात – जया किशोरी यांचे, शिस्त आणि चिकाटीचा महत्त्व पटवून देणारे व्याख्यान उपस्थित विद्यार्थ्यांना विशेष भावले.यावेळी सैन्य दलाच्या विविध शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक प्रदर्शन आणि आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाची झलक हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. प्रसिद्ध मेंटलिस्ट अमित कलंत्री यांचा मन वाचण्याचा परफॉर्मन्स सर्वांना अचंबित करणारा होता. शेवटी सबाली – द बँड’चा लाईव्ह म्युझिकल परफॉर्मन्स ने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढवला.या उपक्रमामुळे भारतीय सैन्यात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या युवकांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाले. पुनीत बालन म्हणाले,आजच्या युगात तरुण पिढी समाज माध्यमांवरच जास्त भर देत आहेत.अशा वेळी त्यांना भारतीय सैन्यदलात करिअरच्या संधी किती आहेत.हे माहिती व्हावे म्हणून युगांतर 2047 या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय लष्कराला सोबत घेत आम्ही केले.यात सुमारे तीन हजार युवक -युवतींनी सहभाग घेतला.यातून किमान दहा टक्के जारी युवकांचे आयुष्य बदलले तरी हा समाधान होईल.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment