मोदींची 15 लाखांची गॅरंटी 1500 वर आली:आता निवडणुकीनंतर ती अवघ्या 15 पैशांवर येईल, उद्धव ठाकरे यांचा हिंगोलीत घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याची गॅरंटी दिली होती मात्र 15 लाखांची गॅरंटी 1500 रुपयांवर आली अन् आता निवडणुकीनंतर 15 पैशांवर येईल, अशा तिखट शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शनिवारी ता. 9 कळमनुरी येथे केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला. कळमनुरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. संतोष टारफे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे.जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, खासदार नागेश पाटील आष्टीकर, विनायक भिसे, जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, संदेश देशमुख, बापूराव घोंगडे, गणेश देशमुख, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात मोदींची नव्हे बाळासाहेबांची गॅरंटी चालते यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्याची गॅरंटी दिली होती. मात्र ती रक्कम अद्यापही जनतनेच्या खात्यात आली नाही. उलट 15 लाखांचे 1500 रुपये झाले. राज्यात पाणी, रस्ते नाहीत असे सरकार कशाला हवे, हे सरकार बदलण्याच्या निश्चयाने आम्ही निवडणुकीच्या मैदानात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात मोदीची नव्हे तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गॅरंटी चालते असा दावा त्यांनी केला. कोरोना काळात मी घरी बसल्याचा आरोप केला जात असून, होय मी घरी बसूनच जनतेच्या घराची काळजी घेत होतो. या काळात जनतेसाठी जे करता येईल केले, जनतेची काळजी घेण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. गद्दारांना तुरुंगाची हवा खाऊ घालण्याचा निर्धार राज्यात शिवसेना उमेदवाराच्या समोर बहुतांश ठिकाणी गद्दार उभा आहे. या गद्दारांना मागील निवडणुकीत उमेदवारी दिली हि आपली चूक झाली, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊन त्यांना निवडून दिले पण त्यांनी गद्दारी केली. गद्दार विकल्या जातो पण निष्ठावंत विकल्या जात नाही. राज्यातील जनतेला छळणाऱ्या या गद्दारांना तरुंगाची हवा खाऊ घालणार असून या गद्दारांना रसातळाला न्या, म्हणजे यापुढे कोणी गद्दारी करण्याची हिंमत करणार नाही असे आवाहन त्यांनी केले. भाजपचे हिंदुत्व घरे, तर आमचे चूल पेटवणारे यावेळी त्यांनी भाजपावर कडाडून टिका केली. भाजपाचे हिंदूत्व घरे पेटविणारे असून आमचे हिंदुत्व घरातील चुली पेटविणारे आहे. मोदी-शहा यांना घरे पेटवून त्यांच्या चुली पेटवायच्या आहेत असा आरोप त्यांनी केंला. एक है तो सेफ है हे आम्हाला शिकविण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या राज्यात एकच सेफ आहे तो म्हणजे आदानी असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली. केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणावरही त्यांनी टिका केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सर्व जिल्हयात महिला अधिकारी व कर्मचारी असलेले पोलिस ठाणे उभारणार असून मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्वावलंबी महाराष्ट्र , सर्वोत्तम महाराष्ट्र घडविणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.