मुकणेत उंडओहोळ नदीपात्रामध्ये पुन्हा रसायनमिश्रित पाण्याचा थर:नदीजवळच पाणीपुरवठा करणारी विहीर असल्याने आरोग्य धोक्यात

मुकणे धरणाखालील उंडओहोळ नदीपात्रात पुन्हा दूषित व काळसर पाणी साचले आहे. सदर पाण्याचा उग्र वास येत असल्याने हे पाणी जनावरांना व शेतीसाठी दूषित असल्याने संबंधीत विभागाने चौकशी करून प्रतिबंध घालण्याची मागणी मुकणेसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. मुकणे धरणातील उंडओहोळ नदीपात्रातून रसायनमिश्रित दूषित व काळसर पाणी येत असून या पाण्याचा उग्र वास येत आहे. नदीपात्राद्वारे हे पाणी नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पाद्वारे पुढे जाते. नदीपात्राच्या काठावरील सर्वच गावांना या पाण्याचा उपयोग होतो. मात्र पाळीव जनावरांच्या आरोग्याला व शेतीलाही या दूषित पाण्यामुळे धोका आहे. शेतीच्या पिकांना पाणी भरल्यानंतर जमिनीवरील पाणी जिरल्यावर जमिनीवर लालसर थर तयार होतो तसेच नदीपात्रातील दगडांवरही या पाण्यामुळे लालसर व काळा थर तयार होत असल्याचे शेतकरी सांगतात. दरम्यान, धरणातुन आवर्तन सुटल्यानंतर या प्रवाहित पाण्यातच दूषित पाणी टँकरद्वारे किंवा इतर प्रकारे सोडले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत असून याबाबत नाशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ व नाशिक पाटबंधारे विभागही पुर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांमधून होत असून यावर लवकरात लवकर तोडगा काढून दूषित पाणी नदीपात्रात सोडणाऱ्या टँकर किंवा रसायन मिश्रित दूषित पाणी सोडणाऱ्या कंपनीचा शोध घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने व पाटबंधारे विभागाने कारवाई करून दूषित पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी खंडू राव, माजी सभापती गणपत राव, सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव आदींसह शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. या नदीपात्रालगतच मुकणे गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर असल्याने येथील दूषित पाण्यामुळे २००८ मध्ये मुकणे गावात गॅस्ट्रोची साथ आली होती. आता नवीन विहीरही नदीपात्राजवळच काही अंतरावर असल्याने गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी सदर विहीरीला पाण्यासाठी आडव्या बोअर मारले असून त्यातुन दूषित पाणी बोअरवेलद्वारे उतरण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे रसायनमिश्रित पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुकणे धरणाखलील उंडओहोळ नदीपात्रात कंपन्यांकडून टँकरद्वारे रसायनमिश्रित पाणी सोडत असल्याबाबत स्थानिक शेतकऱ्यांकडून नेहमीच ओरड होते. मात्र संबंधीत प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा अन्य कुठलाही विभाग याकडे गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष करीत असल्याने याचा स्थानिक शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास होत आहे. यामुळे भविष्यात मोठा दुष्परिणाम होऊन हानी होण्याची शक्यता आहे. संबंधीत प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभाग, आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. – जगन राव, अध्यक्ष, सहकारी संस्था मुकणे