मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार:घरातील सीसीटीव्हीमुळे घटना उघडकीस, 20 वर्षीय नराधमाला अटक
मुंबई येथील दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 78 वर्षीय वृद्ध महिलेवर 20 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे हा प्रकार उघडकीस आला. तसेच नराधम तरूनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे. प्रकाश मोरिया असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर कलम 64(1) आणि 332(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करत न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वृद्ध महिलेला विस्मरणाचा त्रास असून याचा गैरफायदा आरोपीने घेतला. मात्र घरात असलेल्या सीसीटीव्हीमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला घरात एकटीच होती. या महिलेला डिमेंशिया आणि मेमरी लॉसचा आजार आहे. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी घरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. या महिलेला घरात एकटी असल्याचे बघून आरोपी घरात शिरला. महिला तिच्या रूममध्ये झोपली असताना आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घरातील सीसीटीव्हीमुळे हा प्रकार महिलेच्या कुटुंबीयांना समजला. कुटुंबीयांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध चालू केला आणि अटक देखील केली. अटक केल्यावर तातडीने न्यायालयात हजर केले व न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.