मुंबईतील पाडलेल्या जैन मंदिरात पूजा:भाविकांच्या डोळ्यात अश्रू, मंदिर पुन्हा बांधण्याचा केला निर्धार

मुंबई येथील विलेपार्ले भागात पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर 16 एप्रिल रोजी पाडण्यात आले. मुंबई महापालिकेच्या आदेशानंतरच मंदिरावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत रॅली काढली होती. जैन समाजाच्या भावना लक्षात घेत महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मनपा अधिकारी नवनाथ घाडगे यांचे निलंबन केले. दरम्यान, मंदिर पडलेल्या ठिकाणी जैन समाजाकडून या जागेवर पूजा करण्यात आली आहे. ज्यांनी मंदिर पाडले त्यांना कोणी माफ करणार नाही रविवारी सकाळी जैन समाज एकत्र येत पाडलेल्या मंदिराच्या ठिकाणी पूजा केली आहे. मंदिराच्या सर्व भिंती तुटल्या आहेत. मंदिराला दरवाजा सुद्धा राहिला नाही. यावेळी भाविक भगवान महावीर यांच्यासमोर नतमस्तक होत भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. यावेळी बोलताना मंदिराच्या पूजारी यांनी म्हटले, हा आमचा खूप मोठा विजय आहे. जोपर्यंत मंदिराचे काम पूर्ण होणार नाही, आम्ही शांत बसणार नाही. ज्यांनी मंदिर पाडले त्यांना कोणी माफ करणार नाही, असेही त्यांनी म्हटले. मुंबई महापालिकेने मंदिर पाडण्याची नोटीस दिली होती. त्यांनंतर जैन समाजाने न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात निर्णय होण्यापूर्वीच महापालिकेने मंदिर पाडले. त्यामुळे जाऊन समाज संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी जैन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहत रॅली काढली होती. यावेळी काही नेते मंडळी देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जैन पुरुष तसेच महिलांचा देखील मोठा सहभाग या रॅलीमध्ये बघायला मिळाला. मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत जैन समाजाची शनिवारी दोन तास बैठक चालली. त्यावेळी समाजाकडून एक निवेदन देण्यात आले. रेस्टॉरंट मालकाच्या सांगण्यावरुन मंदिर तोडण्यात आल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे. मंदिर तोडल्यानंतर जैन समाजाचे लोक त्या ठिकाणी पोहचले आणि मूर्ती एका चबुतरावर ठेऊन पूजा केली.